मनीष दळवी:संचालक मंडळाच्या तिसऱ्या वर्षपूर्ती कार्यक्रमात केले जाहीर..
ओरोस ता १३
जिल्हा बँक प्रामुख्याने शेतकऱ्यांची बँक आहे. त्याच बरोबर युवा वर्ग, महिला, शिक्षण यासाठीही बँक कार्यरत आहे. बँकेकडे विकासाचे केंद्र म्हणून पाहिले जाते. विकासाला बँकेने प्रमुख माध्यम ठरविले असलेतरी ही बँक जिल्ह्याच्या सामाजिक विकासाचे केंद्र बनावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी विद्यमान संचालक मंडळाच्या तिसऱ्या वर्षपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. यावेळी प्लॅटिनम रूपे डेबिट कार्ड या अत्याधुनिक सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.
सिंधुदुर्गनगरी येथील बँकेच्या प्रधान कार्यालय सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक रवींद्र मडगावकर, गजानन गावडे, प्रज्ञा ढवण, निता राणे, विठ्ठल देसाई, आत्माराम ओटवणेकर, गणपत देसाई यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना दळवी यांनी, बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाने १२ जानेवारी २०२५ रोजी आपला तीन वर्षाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पुर्ण केलेला आहे. माजी केंद्रीय मंत्री खा नारायण राणे, मत्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या अध्यक्षीय कारकिर्दीमध्ये मागील केवळ तीन वर्षाच्या कालावधीत बँकेने सर्वांगीण प्रगती साधलेली आहे. जिल्ह्यातील सर्वच आर्थिक स्तरातील ग्राहकांसाठी त्यांच्या गरजा ओळखुन काळानुरुप अंमलात आणलेल्या विविध ठेव, कर्जे इत्यादी ग्राहकाभिमुख योजनांमुळे सामाजिक बांधिलकी जपत बँकेनेही प्रगती साधत आपली आर्थिक स्थिती मजबुत केलेली आहे. आजच्या तांत्रिक युगाची गरज ओळखुन बँकेने त्या त्या वेळी घेतलेल्या योग्य निर्णयामुळे जिल्हयातील राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका यांच्याबरोबर स्पर्धेत उतरत डिजीटल बँकिंगसह सर्वच बाबतीत अगदी राज्यस्तरावर आघाडीवर रहाण्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँक यशस्वी झालेली आहे. शिस्त, कामाचे काटेकोर नियोजन व तितकीच काटेकोर अंमलबजावणीची सुत्रे सर्वच सहकाऱ्यांनी अंमलात आणल्यामुळे हे यश प्राप्त झाले, असे सांगितले.
