⚡बांदा ता.२३-: माहीम विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश सावंत यांनी आज सोमवारी सकाळी श्री बांदेश्वर भूमिका मंदिराला भेट देऊन श्री दर्शन घेतले. आमदार सावंत यांच्या विजयासाठी त्यांचे कुटुंबिय व नातेवाईकांनी श्री बांदेश्वराला नवस केला होता. त्यानुसार आ. सावंत यांनी श्री दर्शन घेऊन नवसफेड केली.
यावेळी आ. सावंत म्हणाले, मी मूळ मातोंड (तालुका वेंगुर्ले) येथील असून जिल्ह्यात सातत्याने ये जा असते. श्री बांदेश्वर भूमिका हे अत्यंत जागृत देवस्थान असून कुटुंबीयांनी माझ्या विजयासाठी केलेला नवसफेड करण्यासाठी आलो. ढोलपुरी दगडात उभारलेले बांदेश्वर मंदिर सुबक व देखणे आहे. गोवा सीमेवर असलेल्या या मंदिराची प्रसिद्धी झाल्यास याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येऊ शकतात. मतदारसंघासह जिल्ह्याच्या विकासासाठी खारीचा वाटा उचलेन, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
यावेळी श्री बांदेश्वर भूमिका देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष तथा उपसरपंच बाळू सावंत यांनी त्यांचे श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ. स्मिता सावंत, लवू आईर, मुकेश गावडे, देवस्थान समिती सचिव राजा सावंत, माजी सभापती शीतल राऊळ, ग्रा. पं. सदस्य साईप्रसाद काणेकर, रेश्मा सावंत, योगेश देसाई, पपी शेटकर, आनंद देसाई, निलेश कदम, सौ. स्वाती सावंत, संजय सावंत, सौ. धारगळकर, बाळा पेडणेकर आदी उपस्थित होते. यावेळी आ. महेश सावंत यांनी बांदा ग्रामपंचायत, खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल प्रशालेला भेट दिली.
