अश्विन कुमार व डिंपल गोवडा ठरले वेगवान जलतरणपटू…

मालवण चिवला बीच येथील राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..

⚡मालवण ता.२१-: महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण चिवला बीच येथे आयोजित १४ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेच्या पहिल्या दिवशी राज्यभरातील स्पर्धक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. स्पर्धेतील सर्वात मोठ्या १० किलोमीटर स्पर्धेत पुरुष गटात ठाणे येथील अश्विन कुमार, तर महिलांच्या गटात बेळगाव येथील डिंपल गोवडा यांनी वेगवान जलतरणपटूचा बहुमान पटकवला.

दरम्यान, ५०० मीटर मुलांच्या गटात बेळगाव येथील हर्षवर्धन करलेकर व मुलींच्या गटात दुर्वा कुरणकर यांनी वेगवान जलतरणपटू चषक मिळवला. तर फिन स्विमिंग १ किलोमीटर – ध्रुव धामणे (नाशिक), आरनी भंडारी (मुंबई), २ किलोमीटर- आलोक जाधव (नाशिक), इयाना पटेल (नाशिक) हे वेगवान जलतरणपटू ठरले.

सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना अध्यक्ष डॉ. दीपक परब व अन्य मान्यवरांच्या हस्ते सागराला श्रीफळ अर्पण करुन १० किमी तसेच अन्य गटातील स्पर्धेचा शुभारंभ झाला. स्पर्धा उदघाटन वेळी डॉ. दीपक परब यांनी खास मालवणी शैलीत गाऱ्हाने घातले.

आज स्पर्धेच्या पहिल्या दिवशी १० किमी, १ व २ किमी. फिन्स स्विमिन्ग, आणि दिव्यांग व ५०० मीटर मुले सहभाग असलेल्या विविध गटात स्पर्धा संपन्न झाली. रविवारी २२ डिसेंबर रोजी सकाळी ५ किमी तसेच अन्य स्पर्धेची सुरुवात होईल. दुपारी १ वाजल्यापासून स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ होईल, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

चिवला बीच येथील स्पर्धेदरम्यान स्पर्धा प्रमुख राजेंद्र पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात लाईफ गार्ड, लाईफ बोट यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धकावर लक्ष ठेवण्यात आला. तसेच किनाऱ्यावर ऍम्ब्युलन्स, डॉक्टर तैनात होते. तसेच आयोजक टीमकडून किनाऱ्यावरून स्पर्धकांवर लक्ष ठेवण्यात येत होते.

स्पर्धेनंतर १० किमी व इतर गटातील विजेत्यांना चषक तसेच मेडल व पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी राज्य संघटना अध्यक्ष आनंद माने, राज्य सेक्रेटरी राजेंद्र पालकर, सिंधुदुर्ग जिल्हा संघटना अध्यक्ष डॉ. दीपक परब, उपाध्यक्ष बाबा परब, उपाध्यक्ष निल लब्दे, किशोर पालकर, अरुण जगताप, युसूफ चुडेसरा, शिवछत्रपती राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय जलतरणपटू सागरकन्या रुपाली रेपाळे, अर्जुन अवार्ड प्राप्त पॅरास्विमर सुयश जाधव, द्रोणाचार्य अवार्ड प्राप्त डॉ. तपन पाने, भरत सैनी, डॉ. राहुल पंतवालावलकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, बाबला पिंटो, बाबू आंगणे यांसह अन्य मान्यवर स्पर्धक, प्रशिक्षक व पालक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राज्य जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने म्हणाले, गेली १४ वर्षे मालवण चिवला बीच येथे होणारी जलतरण स्पर्धा स्थानिक नागरिक, मच्छिमार, पर्यटन व्यावसायिक यां सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग स्पर्धा यशस्वी होते. राज्य तसेच देश पातळीवरील अनेक स्पर्धक यात सहभागी होतात. राज्य सेक्रेटरी राजेंद्र पालकर यांच्या संकल्पनेतील ही स्पर्धा यशस्वी ठरली आहे. सागरी जलतरण स्पर्धेला आंतरराष्ट्रीय पातळीवर ही मान्यता मिळाली आहे. हे पाहता भविष्यात यां स्पर्धेची व्याप्ती अधिक वाढेल, असेही ते म्हणाले.

You cannot copy content of this page