महिलांच्या प्रश्नांबाबत उज्वला येळावीकर यांनी वेधले रुपाली चाकणकर यांचे लक्ष…

ओरोस येथे भेट घेऊन दिले प्रश्नांबाबतचे निवेदन:प्रश्न सोडविण्याची केली मागणी..

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या प्रमुख समस्या बाबत राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्ष उज्ज्वला येळावीकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे लक्ष वेधले आहे. त्या आशयाचे निवेदन त्यांनी श्रीमती चाकणकर याना गुरुवारी ओरोस येथे भेटून दिले.
श्रीमती चाकणकर यांना दिलेल्या निवेदनात सौ. येळावीकर यांनी म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या जीवनमानाशी संबंधित काही गंभीर समस्या आहेत, ज्या सोडवण्यासाठी महिला आयोगाकडून तातडीने हस्तक्षेप होणे आवश्यक आहे. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांना सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळत नाही. प्रसूतीसाठी आणि इतर आरोग्य समस्यांसाठी मोठ्या प्रमाणावर महिलांना दूरच्या शहरी रुग्णालयांवर अवलंबून रहावे लागते. तसेच शिक्षण व रोजगारः बाबत मुलींना उच्च शिक्षणासाठी तसेच कौशल्य विकासाच्या संधी मर्यादित आहेत. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगाराच्या व उ‌द्योजकतेच्या संधी निर्माण होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील काही भागांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा घटनांवर नियंत्रणासाठी कडक पावले उचलणे गरजेचे आहे. महिलांना शिक्षण आणि रोजगारासाठी लांब प्रवास करावा लागतो, पण सार्वजनिक वाहतुकीची सोय अपुरी असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण कार्यक्रमांची अंमलबजावणीः होणे आवश्यक आहे. महिला सक्षमीकरणासाठी असलेले शासकीय कार्यक्रम व योजना प्रभावीपणे राबविण्यात काही प्रमाणात अडथळे येत आहेत. तरी वरील समस्या सोडवण्यासाठी आपण तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्ष उज्वला येळवीकर यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे विधानसभा निवडणूक लढवलेले उमेदवार अनंतराज पाटकर, तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे कुडाळ तालुका अध्यक्ष विजय येळावीकर आणि कार्तिक कदम उपस्थित होते. यावेळी श्रीमती येळावीकर यांनी रुपाली चाकणकर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जिल्ह्यात स्वागत केले.

You cannot copy content of this page