उबाठा शिवसेनेच्या अल्टिमेटमनंतर महावितरण ऍक्टिव..
कुडाळ, प्रतिनिधी
पिंगुळी ग्रामीण भागात वीज समस्या गंभीर बनली असल्याने बुधवारी ठाकरे शिवसेना, पिंगुळी आणि समस्त पिंगुळीवासियांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी धारेवर धरले. तसेच पिंगुळी ग्रामीणमधील वीज समस्या ८ दिवसात न सोडविल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला होता.
ठाकरे शिवसेना आणि पिंगुळीवासियांनी घेतलेला आक्रमक पवित्रा पाहता महावितरण खडबडून जागे झाले. महावितरणने या प्रकरणी तत्काळ दखल घेत उप कार्यकारी अभियंता विजय जाधव व कनिष्ठ अभियंता सावळाराम पेडणेकर यांनी पिंगुळी गावातील कामाची पडताळणी करून अखेर वीज समस्या सोडवण्यास सुरुवात केली. यावेळी पिंगुळी उबाठा गटाचे विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, युवासेना तालुका सचिव केतन शिरोडकर, दीपक धुरी, हेमंत पिंगुळकर, तुलसीदास पिंगुळकर, दीपक गावडे, बाबल गावडे, अनिकेत आदुर्लेकर, आनंद माडये, प्रवीण माडये, सिध्देश दाभोलकर, रामा पिंगुळकर, केदार रासम उपस्तिथ होते.
