श्रीधर काळे:मालवणात विश्व हिंदू परीषदेतर्फे गीता वाचन कार्यक्रम संपन्न..
⚡मालवण ता.११-: संत श्री ज्ञानेश्वर, लोकमान्य टिळक यांनी गीतेचे महत्व जाणले आणि समाज घडविण्याच्या दृष्टीने गीतेतील संदेशांना सुलभपणे सामन्य लोकांपर्यंत पोहोचवले. मानवाचे संपूर्ण जीवन सुखकर होण्यासाठी गीतेचे नियमित वाचन, पठण व आचरण करणे महत्वाचे आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी गीता वाचन केले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्रीधर काळे यांनी येथे बोलताना केले.
हिंदू परीषद, मालवण प्रखंडच्या वतीने, ५१६१ व्या गीता जयंती निमित्त मालवण येथील कन्याशाळेच्या कै. गंगूबाई कृष्णराव देसाई सभागृह येथे प्रशालेच्या पहिली ते सातवीच्या १५० विद्यार्थ्यांचा सामूहिक गीता वाचन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व व्याख्याते श्रीधर काळे हे बोलत होते. यावेळी सत्संग आयामाचे प्रमुख प्रभूदास आजगांवकर आणि विश्व हिंदू परिषद, मालवण प्रखंड अध्यक्ष भाऊ सामंत हे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी प्रभूदास आजगांवकर यांनी प्रास्ताविकात विश्व हिंदू परिषदेच्या सत्संग आयामा अंतर्गत गीता वाचन कार्यक्रमाची माहिती दिली. गीता ही जीवनातील सर्व समस्यांचे समाधान आहे. जे उपाय गुगलमध्येही सापडणार नाहीत ते आपल्याला गीतेमध्ये सापडतील. गीतेचे वाचन, पठण याचसोबत तिचे आचरण करणे हे महत्वाचे आहे, असे प्रभूदास आजगांवकर यांनी सांगत सर्वांना सुस्वर लयीमध्ये गीतेच्या अध्यायांचे वाचन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या समारोपाला उद्योजक भूषण साटम यांनी पसायदान सादर केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मालवण तालुका कार्यवाह रत्नाकर कोळंबकर, सनातन संस्था मालवणचे अरविंद मयेकर, विश्व हिंदू परीषदेचे कार्यकर्ते जयराम उर्फ बबन परुळेकर तसेच कन्याशाळा प्रशालेच्या शिक्षिका सौ. करलकर, सौ. गोसावी, सौ. चव्हाण, सौ. राऊळ व सौ. गार्गी कुशे व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
