कसई – दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचे तालुकावासीयांना आवाहन..
दोडामार्ग ता.०९-:
बांग्लादेशमध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टर पंथियांकडून होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात उद्या ( ता .१०) मंगळवारी सिधुदुर्गनगरीत होणाऱ्या बांगलादेश हिंदू न्याय यात्रेत हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कसई – दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केले आहे.
बांग्लादेशमध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टर पंथियांकडून अमानुष अत्याचार केले जात आहेत.हिंदूं देवतांची मंदिरे उद्धवस्त केली जात आहेत.घरे , दुकाने जाळली जात आहेत.हिंदू धर्मीय महिला व मुलींवर अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहेत.तेथील मुंडा , चकमा , कुकी ,बौद्ध , इत्यादी आदिवासी व दलित हिंदू बांधवांना इस्लामी कट्टरवादयानी जीवन जगणे अत्यंत कष्टप्रद करून टाकले आहे.या सर्व बाबींची भारतातील हिंदू बांधवांस चिंता वाटू लागली आहे.या सर्व अत्याचाराचा निषेध शांततेने आणि लोकशाही मार्गाने व्यक्त करणाऱ्या इस्कॉनच्या साधूंना देखील बांग्लादेशच्या सरकारने देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबले आहे.त्यांना तत्काळ सोडावे व हिंदूवरील अत्याचार थांबवावेत या मागणीसाठी सिधुदुर्गनगरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बांग्लादेश हिंदू न्याय मूक यात्रा काढण्यात येणार असून या यात्रेत तालुक्यातील हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केले आहे
