मालवणातील स्वीमिंग स्पर्धेत स्थानिक स्पर्धकांना फी मध्ये सूट मिळावी…

शिल्पा खोत यांची प्रशासनाकडे मागणी..

⚡मालवण ता.०५-: मालवणमध्ये चिवला बीच येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय स्वीमिंग स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्थानिक स्पर्धकांना फी मध्ये सूट मिळावी, अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांनी मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे व मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांना दिले आहे.

मालवणमध्ये चिवला बीच येथे पोहण्याच्या स्पर्धा (स्विमिंग कॉम्पिटिशन) आयोजित केली जाते. चिवला बीच येथील समुद्रकिनाऱ्यावर मुंबईची एक संस्था दरवर्षी पोहण्याच्या स्पर्धा आयोजित करते. या स्पर्धांसाठी प्रत्येक स्पर्धकाला रु. २०००/- (दोन हजार रुपये) अशी मोठी रक्कम ‘फी’ म्हणून आकारली जाते. मात्र स्थानिक मुलांना फीमध्ये कोणत्याही प्रकारे सूट दिली जात नाही. स्थानिक मुलांचे पालक शहरवासियांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या संपन्न नसल्यामुळे, केवळ आर्थिक कारणास्तव स्थानिक मुलांना ह्या स्पर्धांमध्ये सहभागी होणे शक्य होत नाही. त्यामुळे नगरपरिषदेमार्फत स्थानिक भूमिपुत्रांना १००% फीमध्ये सूट देण्याची अट सदर संस्थेला परवानगी देतानाच घालण्यात यावी. तसेच गावातील भूमीपुत्रांसाठी हे कायम स्वरूपी धोरण ठेवावे व त्यांना फी मध्ये पूर्णतः माफी द्यावी. या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख अर्जामध्ये केलेला असावा. मागणीची दखल घेऊन स्थानिक मुलांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळावी असे शिल्पा खोत यांनी निवेदनात म्हटले आहे.

यावेळी शिल्पा खोत यांच्या समवेत मालवणचे माजी नगरसेवक यतीन खोत, मंदार केणी, बाबी जोगी, महेश जावकर, सन्मेष परब, तपस्वी मयेकर, नरेश हुले, अमन बेग, निखिल शिंदे, नंदा सारंग, शांती तोंवळकर, अश्विनी आचरेकर, मानसी घाडीगावकर, तन्वी भगत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page