रियाज खान यांनी गटविकास अधिकाऱ्यांचे वेदले लक्ष:आठ दिवसात न दिल्यास प्रसंगी आंदोलन करणार..
⚡बांदा ता.०४-: बांदा शहरातील निमजगा येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना अद्यापपर्यंत गणवेश वाटप करण्यात न आल्याने ठाकरे शिवसेना गट आक्रमक झाला आहे. उबाठाचे युवासेना तालुका उपाध्यक्ष रियाज खान यांनी यासंदर्भात सावंतवाडीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. येत्या आठ दिवसात विद्यार्थ्यांना गणवेश न दिल्यास प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, जून मध्ये शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. मात्र अद्यापपर्यंत मुलांना गणवेश देण्यात आले नाहीत. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांना निवेदन देऊन तसेच वेळोवेळी कल्पनाही देण्यात आली आहे. मात्र यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नाही. अर्धे शैक्षणिक वर्ष उलटून गेले तरीही विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात न आल्याने शैक्षणिक खात्याच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
येत्या आठ दिवसात याबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी विजय बांदेकर, रंगनाथ मोठे, सचिन राठोड, शैलेश टिळवे आदी उपस्थित होते.
