वेंगुर्ला प्रतिनिधी- वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसच्यावतीने सलग अकराव्या वर्षी अश्वमेध महोत्सवांतर्गत खुल्या व शालेय गटासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
आधुनिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रिल्सचा प्रभाव वाढत चालला आहे. युवा वर्गावर रिल्सच्या माध्यमातून अनैतिक वर्तनाचे संकट निर्माण होत असल्याचे दिसत आहे. मनोरंजनाच्या नावाखाली भडक सामग्री आणि अश्लीलता वाढत असल्यामुळे समाजातील मूल्यांची हानी होऊ शकते. या प्रकारच्या सामग्रीची सहज उपलब्धता आणि त्वरित लोकप्रियता यामुळे व्यक्तीचे वर्तन बदलत आहे. रिल्स केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही, तर ते स्वैराचाराचे गढ बनत चालले आहे. यामुळे युवा पिढीला अधिक जागरूक आणि विचारशील बनण्याची गरज आहे. एकत्रितपणे, या संदर्भात सामाजिक मूल्यांचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि सत्यता पडताळून पाहण्यासाठी खुल्या गटासाठी ‘रिल्स स्वैराचाराला आमंत्रण देतायेत का?‘ हा विषय ठेवण्यात आला आहे.
आजच्या काळात आपल्या समाजात आणि देशात विविध बदल होत आहेत. काही गोष्टी टिकून राहतात, तर काही बदलतात. परंतु इतिहासाच्या पानांवर एक अशी व्यक्ती आहे जिने आपल्या कर्तृत्वाने, नेतृत्वाने आणि समर्पणाने सगळ्यांना प्रेरित केले आहे. त्या महापुरुषाचे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जर आज शिवराय असते, तर त्यांची कृती आणि विचार कसे असते, याची कल्पना करणे, आपल्या समाजाची दिशा कशी असावी, याबद्दल विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या शौर्याच्या आणि प्रगल्भ नेतृत्वाच्या प्रकाशात आपण आपल्या जीवनाच्या आणि समाजाच्या समस्यांवर कसे मात करू शकतो, हे जाणून घेणे गरजेचे आहे. याबद्दल आपले विचार व्यक्त करण्यासाठी इयत्ता १० पर्यंतच्या शालेय गटासाठी ‘आज शिवराय असते तर‘ हा विषय देण्यात आला आहे.
खुल्या गटासाठी अनुक्रमे ११००, ७७७, ५५५ आणि शालेय गटासाठी अनुक्रमे ७७७, ५५५, ३३३ यांसह चषक आणि प्रमाणपत्र तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धकांनी निबंध कागदाच्या एका बाजूला स्वःहस्ताक्षरात (खुला गटः किमान १०००शब्द, शालेय गटः किमान ५०० शब्द) मराठी भाषेत लिहून वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस, द्वारा- पा.डॉ.सचिन वासुदेव परुळकर, मु.पो.तुळस, खरीवाडी, वेंगुर्ला-४१६५१५ या पत्त्यावर दि.२० डिसेंबर पर्यंत पाठवावा.
स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी सचिव प्रा.डॉ.सचिन परुळकर (९४२१२३८०५३) यांच्याशी संफ साधावा असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.
