⚡वेंगुर्ला ता.१२-: जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजिव लिगवत यांनी केरळीयांना जमिनी विकणा-या कोकणी माणसांना विरोध करत त्याबद्दल जनजागृतीही केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन पुरस्कार विजेते नामदेव चौगुले यांच्या हस्ते डॉ.लिगवत यांचा निपाणी येथे सत्कार करण्यात आला.
जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि विविध संस्थांवर कार्यरत असलेले डॉ.संजिव लिगवत गेली बरीच वर्षे समाजात पर्वत पूजन, कृषी मेळावे, प्लॅस्टिक उठाव मोहिम, वृक्ष संवर्धन, किल्ले संवर्धन, स्वच्छता आदी उपक्रम राबविण्यासोबत समाजातील अनिष्ट प्रथांबाबत जनजागृतीही करीत आहेत. कोकणातील जमिनी या प्रामुख्याने केरळयीन व परराज्यातील उद्योजकांना विकल्या जात असल्याने येथील भूमिपूत्र बेरोजगार होत आहेत. या प्रकाराला कडाडून विरोध करताना डॉ.लिगवत यांनी भूमिपूत्रांमध्ये जनजागृती केली आहे. त्याचा प्रारंभ त्यांनी आपल्या गावापासून केला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नामदेव चौगुले यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ, पुस्तके व रोप देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या अपुर्वा चौगुले व निपाणी विश्वकर्मा संघटनेचे सुनील सुतार उपस्थित होते.
