शिवसेना जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांचा संतोष शिरसाट यांना टोला:वैभव नाईक हे यापुढे कुडाळ-मालवणमध्ये कधीही न दिसणारे माजी आमदार..
कुडाळ, प्रतिनिधी
वादळात शहामृग वाळूत डोके खूपवून बसतो आणि आजूबाजूला काहीच नसल्याचे समजतो तशी अवस्था आज कुडाळ-मालवणच्या उबाठा सैनिकांची झाली आहे. त्यांना वादळी दौरे काढत असलेले खासदार नारायण राणे हे न दिसणारे खासदार वाटू लागले आहेत. अशांना सल्ला राहील की, निवडणूकीपूर्वी डोके वाळूतून बाहेर काढावे म्हणजे निदान भविष्यात कुडाळ-मालवणमध्ये ‘न दिसणारे आमदार’ त्यांना डोळे भरून पाहता येतील, असा उपरोधिक सल्ला शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी संतोष शिरसाट यांचे नाव न घेता त्यांच्यासह शिल्लक उरलेल्या उबाठा सैनिकांना दिला आहे.
उबाठाचे संतोष शिरसाट यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर टीका करतांना त्यांचा उल्लेख “न दिसणारे खासदार” असा करत वैभव नाईक तिसऱ्यांदा निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. त्याला प्रतिउत्तर देताना शिवसेना जिल्हा प्रवक्ते यांनी हे त्यांचे दिवास्वप्न असल्याची टीका केली आहे. नाक्यावरच्या उबाठा कार्यालयात बसून झोपा काढत वैभव नाईक तिसऱ्यांदा आमदार होण्याची दिवास्वप्ने पाहणाऱ्याना झंजावाती वादळी दौरे काढणारे नारायण राणे हे न दिसणारे खासदार वाटतात, याचे नवल वाटत नाही, त्यांची रेंजच तेवढी असे जोशी यांनी म्हंटले आहे.
तुम्ही यापुढे मतदारसंघात २४ तास दिसणाऱ्या भावी आमदार निलेश राणेंचा विचार करावा. मागच्या दहा वर्षाच्या कंत्राटदारीच्या कारभारात वैभव नाईक यांनी कुडाळ-मालवण मतदारसंघ विकासात ५० वर्षे पाठीमागे नेला आहे. लग्न, मुंजी, बारशाला आडवा हात मारणे, एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याचाच वडापाव खाणे म्हणजे मतदारसंघाचा विकास नव्हे. संतोष शिरसाट हे कामे वैभव नाईक यांनी केली म्हणून सांगतात, ती कोणीही आमदार आला तरी मिळणाऱ्या आमदार फंडातून करेल अशी होती. मात्र, त्यातही केलेल्या सगळ्या कामाचा त्यांनी कमिशनबाजीच्या राजकारणात सत्यानाश लावला आहे. शहराच्या मध्यभागी उभे असलेले आणि प्रवाशांच्या गैरसोयीचे प्रतीक झालेले कुडाळ बसस्थानक हे वैभव नाईक यांच्या अपयशी कारकिर्दीचे प्रातिनिधिक रूप आहे.
याउलट कोणतेही पद नसतांना निलेश राणे यांनी इथल्या जनतेच्या विकासासाठी स्वतःच्या खिशात हात घालून मदत केलीच. पण या मतदारसंघात करोडोंचा निधीही आणून दाखवला. याला दम म्हणतात. निलेश राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले त्याचवेळी त्यांनी या मतदारसंघासाठी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुतीचे कुडाळ-मालवणमध्ये न भूतो न भविष्यती असे परिवर्तन घडवणारे भावी आमदार पद जनतेसाठी आणले. मात्र गणेश चतुर्थीला एकनाथ शिंदेंकडून ताडपत्री, तेल, साखर, उदबत्त्या आणून आपल्या नावाचे लेबल लावणाऱ्यांना आणि त्यांच्या शिल्लक पदाधिकाऱ्यांना निलेश राणे नावातली ताकद काय समजणार? परिवर्तनाची ही ताकद समजण्यासाठी त्यांनी यापुढे २४ तास सतत जनतेमध्ये मिसळणारे आणि त्यांच्या सुखदुःखासाठी स्वतःच्या खिशात हात घालून मदत करणारे ‘आमदार निलेश राणे’ पाहण्याची तयारी ठेवावी, वैभव नाईक हे आता फुकटचा गडगडाट करत माघारी जाणारा परतीचा पाऊस असल्याचे रत्नाकर जोशी यांनी म्हंटले आहे.
