निलेश राणे यांना मताधिक्य मिळविण्यासाठी आपणच उमेदवार असल्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्याने काम करावे…

दत्ता सामंत:शिवसेना नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार व कार्यकर्ता मेळावा संपन्न..

मालवण दि प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पराभवाची परतफेड करण्याची वेळ आली आहे. महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मताधिक्य मिळविण्यासाठी आपणच उमेदवार असल्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्याने काम करायला हवे. लोकसभा निवडणुकीत श्री. राणे यांना कुडाळ- मालवण मतदार संघातून मिळालेल्या मताधिक्यापेक्षा जास्तीचे मताधिक्य निलेश राणे यांना मिळवून देवून राज्यात पुन्हा एकदा शिवसेनेचा गड म्हणून कुडाळ-मालवण मतदार संघाचे नाव करूया, असे प्रतिपादन शिवसेना (शिंदे गट )जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आज येथे केले.

कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालय येथे आज शिवसेना नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर, महेश राणे, मतदार संघ समन्वयक महेश कांदळगावकर, प्रितम गावडे, मधुकर चव्हाण, विश्वास गावकर, किसन मांजरेकर, सुरेश चौकेकर, दिलीप बिरमोळे, रविना घाडीगावकर, सुधीर साळसकर, स्नेहल बिरमोळे, संतोष कोदे, सुनील घाडीगावकर, संतोष साटविलकर, सुशांत घाडीगावकर, मंदार लुडबे, रत्नाकर जोशी, निलम शिंदे, बाळु नाटेकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, उपतालुका प्रमुख पराग खोत, शहर प्रमुख बाळू नाटेकर, उपजिल्हा प्रमुख नीलम शिंदे, महिला तालुका प्रमुख मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री, हर्षद पारकर, चंद्रकांत गोलतकर, अल्पेश निकम, युवासेना जिल्हा प्रमुख ऋत्विक सामंत, युवती सेना जिल्हा संघटक सोनाली पाटकर, पूनम वाटेगावकर, रूपेश पावसकर, जेरॉन फर्नांडिस, महेश बागवे, छोटू ठाकूर, राजू सावंत, दादा परब, बाळा माने, उमेश बिरमोळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. प्रांरभी राजा गावकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी आजपर्यंत तालुका कार्यकर्त्यांच्या सभेला दुचाकीवरून कार्यकर्ते येत होते, मात्र आज तीन वर्षांनंतर मालवण तालुका कार्यकर्त्यांच्या सभेला गाड्यांच्या गाड्या भरून कार्यकर्ते आल्याचे पाहून समाधान वाटले. निलेश राणे आणि दत्ता सामंत हे संघटनेत आल्याने नविन उभारी मिळणार आहे. यावेळी महायुतीचे उमेदवार निलेश राणे, शिवसेना नेते म्हणून निवड झालेल्या संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख राजा गावडे यांचा सत्कार करण्यात आला

यावेळी बोलताना दत्ता सामंत म्हणाले आज निलेश राणे यांनाही धनुष्यबाण निशाणीवर निवडणूक लढविण्याची संधी मिळाली असल्याने त्यांचा विजय हा १०१ टक्के निश्चित झाला आहे नारायण राणे यांच्या कारकिर्दीत झालेल्या विकासकामांच्या पुढे गेल्या दहा वर्षात दहा टक्केही कामे झाली नाहीत. यामुळे गावागावात निधीची समस्या निर्माण होवून जनता विकासाच्या प्रतिक्षेत राहिली आहे. यामुळे आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुडाळ-मालवण मतदार संघासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द दिला आहे. यामुळे गेल्या दहा वर्षात लोकांना होत असलेला त्रास भविष्यातील सहा महिन्यात दूर केला जाईल. गावागावातील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्याची क्षमता निलेश राणे यांच्यात असून त्यांच्यावतीने आम्ही शब्द देत आहोत. विरोधकांकडून खोटा प्रचार करण्यात येईल पण आम्ही त्यापुढे जावून मताधिक्य कसे मिळणार याकडे लक्ष देणार आहोत. कार्यकर्त्यांनी मताधिक्य मिळवून देण्यासाठी काम करावे. काम करणाऱ्या व्यक्तीचा संघटनेत सन्मान केला जाणार आहे असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले, गेल्या दहा वर्षांच्या काळात नारायण राणे यांना सोडून अनेक जण गेले मलाही अनेकदा अनेक ऑफर आल्या. मात्र मी कधीही राणेंपासून लांब जाण्याचा निर्णय घेतला नाही. सगळेजण गेले तरी मी राणेंसोबतच राहणार असल्याचे निश्चीत केले आहे. राणेंसोबत असल्याने समाजातील अनेकांच्या सुखदुःखात सहभागी होता आले, अनेक राजकीय पदे भुषविता आली आहेत, त्यांनी आज मानसन्मान मिळवून दिला आहे. यामुळेच माझ्या हातून होत असलेल्या समाजकार्यामुळे आज अनेकजण याठिकाणी उपस्थित राहिले आहेत. या सर्वांच्या साक्षीने मी निलेश राणे यांना ५० हजारांचे मताधिक्य देणार असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.

यावेळी बोलताना माजी खासदार निलेश राणे म्हणाले, खासदार नारायण राणे यांच्या राजकीय कारकिर्दीचीही सुरूवात धुनष्यबाणानेच झाली होती, यामुळे आज त्यांच्याच निशाणीवर मला निवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे. गेल्या दहा वर्षात हा मतदार संघ अनेक वर्षे मागे गेला आहे. हा मतदार संघ पाच वर्षात राज्यातील पहिल्या पाच मतदार संघांमध्ये नेऊन पोहचविण्याचे काम मी करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी गेल्या काही महिन्यात कोट्यवधी रूपयांचा निधी जिल्हयासाठी उपलब्ध करून दिल्याने काही प्रमाणात कामे झाली आहेत. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनीही या मतदार संघासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र आमदार वैभव नाईक यांची प्रशासनावर पकड नसल्याने निधी असतानाही कामे अपूर्ण राहिली असल्याचा टोला श्री. राणे यांनी लगावीत ते म्हणाले, निवडणुकीतही खोट्या अफवा पसरविण्यात येतील. यामुळे कार्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून घराघरात पोहचून घनुष्यबाण निशाणीवर मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री. राणे यांनी केले.

शिवसेना नेते संजय आंग्रे यांनी निलेश राणे विधानसभेचे तर दत्ता सामंत विधानपरिषदेचे आमदार होणार आहेत. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशाप्रकारचा शब्द दिला आहे. मालवण कुडाळ मतदार संघाला दोन दोन आमदारांचा निधी मिळणार आहे. यामुळे कार्यकर्त्यांनी निलेश राणेंचा प्रचंड मताधिक्याने विजय होणे आवश्यक आहे, असे सांगितले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुखपदी आनंद शिरवलकर, जिल्हा सचिव म्हणून सुरेश चौकेकर, युवा सेना जिल्हा समन्वयक म्हणून मंदार लुडबे यांची नियुक्ती करून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page