मालवण (प्रतिनिधी)
मालवण शहरातील नरकासुर धिंड आणि निवडणूक या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी मालवण शहरातून पोलीस व केंद्रीय सुरक्षा बल यांच्यातर्फे संचलन करण्यात आले.
नरकासुर दहनाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात विविध मंडळाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या नरकासुरांची धिंड दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, ध्वनी प्रदूषण होऊ नये पार्श्वभूमीवर नरकासुराची धिंड काढणाऱ्या मंडळांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत. संबंधितांनी या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. यात अनुचित प्रकार घडल्यास, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, तसेच विधानसभा निवडणुकीसाठी आचार संहिता लागू असून त्याचे काटेकोर पालन करण्यात यावे, असे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. या संचलनात पोलीस अधिकारी, कर्मचारी व केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान सहभागी झाले होते.
