परशुराम उपरकर यांची टीका:मालवण तालुका ठाकरे शिवसेनेतर्फे सत्कार समारंभ संपन्न..
⚡मालवण ता.२६-: नारायण राणे यांनी २००५ मध्ये शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर दिलेल्या जबाबदारीनुसार मी शिवसैनिकांच्या जोरावर शिवसेना वाढवली होती. आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यावर पुन्हा रामराज्य आणण्यासाठी मी ठाकरे शिवसेनेत दाखल झालो आहे. नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र वेगवेगळ्या पक्षातून लढत असल्याने त्यांची अवस्था आता एका हातात कमळ आणि दुसऱ्या हातात धनुष्यबाण अशी झाली आहे, त्यामुळे राणेंचे पार्सल पुन्हा एकदा मुंबईला पाठवायचे आहे व वैभव नाईक यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला पुन्हा निवडून आणायचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मालवण येथे बोलताना केली.
ठाकरे शिवसेनेनत परतलेले माजी आमदार परशुराम उपरकर यांचा आज सायंकाळी मालवण येथील चिवला हॉटेल मध्ये मालवण तालुका ठाकरे शिवसेनेतर्फे सत्कार समारंभ संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन उपरकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी नगरसेवक नितीन वाळके, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, महिला आघाडीच्या श्रेया परब आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना परशुराम उपरकर म्हणाले, कुठेही नतमस्तक न झालेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कोकणात शिवसेनेचे सात आमदार निवडून आल्यावर मालवण येथील सभेत जनतेसमोर नतमस्तक झाले होते, हे मालवणचे भाग्य आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यावर बाळासाहेबांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली होती. आज पुन्हा मी शिवसेनेत आलो आहे. मी शिवसेनेसोबत आहे, आणि एक कार्यकर्ता म्हणून काम करेन. आमदार वैभव नाईक यांना पुन्हा एकदा निवडून आणून पालकमंत्री बनवायचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी मशाल ही निशाणी सर्वत्र पोहचवली पाहिजे, प्रतिस्पर्ध्याकडून पैशाचा पडेल, मात्र आपल्याला निष्ठेचा पाऊस पाडायचा आहे, असेही उपरकर म्हणाले.
नारायण राणे यांचे एक पुत्र भाजप मधून तर दुसरे शिंदे गटातून लढणार आहेत. त्यामुळे प्रचार करताना एकीकडे कमळ बटण दाबा व दुसरीकडे धनुष्यबाण बटण दाबा असे सांगण्याची वेळ नारायण राणे यांच्यावर आली आहे. कुडाळ येथील सभेत मुख्यमंत्री येतायत, कोणी जाऊ नका असे सांगण्याची वेळ नारायण राणेंवर आली. केंद्रीय मंत्रीपदाचा खरा लाभही राणे यांनीच घेतला, अशी टीका उपरकर यांनी यावेळी केली.
यावेळी हरी खोबरेकर, भाई गोवेकर यांनीही विचार मांडले. यावेळी बाबी जोगी, उमेश मांजरेकर, विनोद सांडव, भगवान लुडबे, मंदार ओरसकर, नरेश हुले, दीपा शिंदे, पूनम चव्हाण, शिल्पा खोत, तृप्ती मयेकर, नीनाक्षी शिंदे यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
