मालवण (प्रतिनिधी)
नगर वाचन मंदिर, मालवण आयोजित कवी स्व. शरद साटम स्मृती जिल्हास्तरीय स्वरचित काव्य स्पर्धेत मैत्रेयी बांदेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर द्वितीय क्रमांक नारायण धुरी, तृतीय क्रमांक प्रकाश पाटील यांनी मिळविला. तर भूषण दत्तदास व अंजुषा पिल्लई यांची उत्तेजनार्थ म्हणून निवड करण्यात आली.
ही स्पर्धा नगर वाचन मंदिरच्या सभागृहात संपन्न झाली. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून दुसऱ्या दिवशी आयोजित या काव्य स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून तसेच श्री देवी सरस्वती व कवी शरद साटम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्यवाह नागेश कदम, परिक्षक ज्येष्ठ साहित्यिक रविंद्र वराडकर, अक्षय सातार्डेकर हे मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक ग्रंथपाल संजय शिंदे यांनी करत मालवणचे कवी शरद साटम यांच्याविषयी माहिती दिली. तर रवींद्र वराडकर यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याबद्दलची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी परिक्षक अक्षय सातार्डेकर यांनी स्पर्धकांना स्पर्धेविषयी मार्गदर्शन केले. यशस्वी स्पर्धकांना रोख पारितोषिके, प्रशस्तीपत्रके व कवी शरद साटम यांचा ‘छळवाद’ हा काव्यसंग्रह देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. स्पर्धेचे सुत्रसंचालन श्रेया वव्हाण यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रतिमा पेडणेकर व रमाकांत जाधव यांचे सहकार्य लाभले.
