कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यांचे भान ठेवून काम करा…

ऐश्वर्या काळूशे:पोलीस पाटील सेवा संघ कार्यालयाचे उदघाटन..

कुडाळ : तुमच्या नियुक्त्या मिळविण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागला आहे. पण आता तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये ओळखून कामाला लागा असे आवाहन प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनी नवनियुक्त पोलीस पाटील यांना केले. कुडाळ सांगिर्डेवाडी येथे सुरु केलेल्या पोलीस पाटील सेवा संघाच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
नवनियुक्त झालेल्या पोलीस पाटील यांनी पोलीस पाटील सेवा संघाची स्थापना जिल्हास्तरावर केली आहे. या सेवा संघाचे कार्यालय कुडाळ-सांगिर्डेवाडी येथे सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे आणि तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या हस्ते फीत सोडून झाले. श्रीमती काळूशे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला तर तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी श्रीफळ वाढून कार्यालयाचा शुभारंभ केला.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, उपनिरीक्षक श्री. वाघाटे, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्य सहसचिव एस. एल. सपकाळ, नायब तहसीलदार प्रदीप पवार, माजी सैनिक सुभेदार सहदेव सावंत, मंडळ अधिकारी गुरूनाथ गुरव, श्री. पास्ते, पोलीस पाटील सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील खरात, उपाध्यक्ष राजन राणे, सचिव सतीश माडये, सहसचिव दीपक गोवेकर, महिला संघटक सुवर्णा म्हाडदळकर, अमित चव्हाण, हेमंत मातोंडकर, बाबली पावसकर, वैभव धुरी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे म्हणाल्या, या नियुक्त्या देताना काय काय घडले हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. पण एकत्रितपणे तुम्ही लढा दिला आणि स्वतःच्या मागण्या कशा रास्त आहेत. हे दाखवून दिले. त्यामुळे या नियुक्त्या तुम्हाला मिळाल्या आहेत. आता निवडणुका आहेत या पार्श्वभूमीवर तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे समजून घ्या आणि कामाला लागा. आता तुम्ही सार्वजनिक क्षेत्रामध्ये आला आहात. त्यामुळे मी निःष्पक्षपणे काम करणे गरजेचे आहे. जसे नियुक्त आम्हाला देता येतात तशा त्या रद्दही करता येतात. त्यामुळे सर्वांनी सांभाळून काम करा. कोणाचीही तक्रार येणार नाही याची काळजी घ्या. जुन्या पोलीस पाटील यांना आदराने हाक मारा ते सुद्धा तुमच्या कामावर प्रभावित होऊन तुम्हाला मार्गदर्शन करतील असे त्यांनी सांगितले.
कुडाळ तहसीलदार वीरसिंह वसावे यांनी सांगितले की, संघटना महत्त्वाची आहेच पण आपण जी सेवा हाती घेतली आहे ती सेवा प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे. कर्तव्यात कोणतीही कसूर होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित न राहता काम केले पाहिजे आणि आपला चेहरा निःष्पक्ष असल्याचे दाखवून दिले पाहिजे. काही कटू निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील. पण त्यामध्ये तडजोड होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्य सहसचिव एस. एल. सपकाळ, नायब तहसीलदार प्सुरदीप पवार, भेदार सहदेव सावंत यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. स्वागत पोलीस पाटील सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सुनील खरात यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तुषार जाधव यांनी तर तर आभार सचिव सतीश माडये यांनी मानले. कार्यक्रमाला नवनिर्वाचित पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page