⚡सावंतवाडी ता.०९-: शिकारीचा उद्देशाने गावठी बॉम्ब पेरल्या प्रकरणी सांगेली व आंबेगाव येथील तिघांना जिल्हा न्यायालयान अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अबीर प्रकाश आंगचेकर, चंद्रकांत शंकर दळवी (दोघे रा. सांगेली) व शांताराम गोपाळ राऊळ (रा. आंबेगाव) अशी संशयिताची नावे आहेत. याप्रकरणी अॅड. परिमल नाईक, सुशील राजगे, रश्मी नाईक, अमिषा बांदेकर यांनी काम पाहिले.
हा गुन्हा २३ जुलैला कुणकेरी जंगलात घडला होता. त्यातील तिघे शिकारीच्या उद्देशाने कुणकेरी जंगलात आढळून आले होते. त्यांच्याकडून गावठी बॉम्ब व साहित्य जप्त करण्यात आले होते. ही कारवाई तत्कालीन वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर यांनी केली होती. त्यांना अटकपूर्व जामीन साठी अर्ज दाखल करण्यात आला होता. यावेळी तपास काम पूर्ण झाले असल्यामुळे अटकेची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद संबंधितांच्या वकिलांकडून करण्यात आल्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
