दोडामार्ग (वा.)
तिलारी घाटातून एसटी सुरु करावी की बंद ठेवावी याचा निर्णय आता गुरुवारी (ता. १०) होणार आहे. रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेली समिती आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करतील आणि त्यावर गुरुवारी निर्णय होईल.
तिलारी घाटातून एसटी वाहतूक पूर्ववत सुरु करावी या मागणीसाठी चंदगड व दोडामार्ग तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सोमवारी कोल्हापूर येथे उपोषण केले होते. त्यानंतर आज मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनेनुसार संबंधित अधिकाऱ्यांनी घाटरस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी एसटी गाडी आणून रस्त्याची चाचणीही घेतली. मात्र, चालक नवखा आणल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करीत धारेवर धरले.
गडहिंग्लज येथील उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज व चंदगड येथील बांधकामचे अधिकारी, आरटीओ अधिकारी, पोलिस अधिकारी, एसटी महामंडळाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यांनी घाट रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर चंदगड येथे तहसीलदार कार्यालयात बैठक घेतली आणि सर्वांनी मिळून अहवाल तयार केला. तो अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.
पाहणीवेळी सरपंच सेवा संघांचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, अंकुश गावडे, मायकल लोबो, दत्ताराम देसाई यांच्यासह दोडामार्ग व चंदगड तालुक्यातील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
तिलारी घाटरस्त्याची समितीकडून पाहणी…
