रियाज खान:सावंतवाडी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर..
बांदा/प्रतिनिधी
बांदा शहरातील निमजगा येथील जिल्हा परिषद शाळेत अर्धे शैक्षणिक वर्ष उलटून गेले तरीही अद्यापपर्यंत मुलांना गणवेश वाटप करण्यात न आल्याने ठाकरे शिवसेना गट आक्रमक झाला आहे. उबाठाचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांनी येत्या आठ दिवसात विद्यार्थ्यांना गणवेश न दिल्यास प्रसंगी विद्यार्थ्यांना शाळेबाहेर बसवून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी सावंतवाडी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, जून मध्ये शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. काही वर्षांपूर्वी निमजगा शाळेतील विद्यार्थ्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला होता. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश देणे आवश्यक आहे. अर्धे शैक्षणिक वर्ष उलटून गेले तरीही विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात न आल्याने शैक्षणिक खात्याच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा मतदारसंघ असूनही विद्यार्थी गणवेश पासून वंचित राहिल्याने याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे.
येत्या आठ दिवसात याबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
