मालवण (प्रतिनिधी)
तारकर्ली गावातील बाळगोपाळांनी गणेशोत्सवात घरोघरी गणेश भजन सादर करून त्याद्वारे जमलेला निधी तारकर्ली मधील अविनाश चंद्रकांत धुरत आणि बबन लोणे या आजाराने त्रस्त असलेल्या गरजू व्यक्तींना मदत म्हणून सुपूर्द केला. सलग सहाव्या वर्षी या बाळगोपाळानी हा उपक्रम राबवित समाजासमोर आदर्श निर्माण केला असून याबद्दल या बाळगोपाळांचे तारकर्ली पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
तारकर्ली गावातील रोहन नरेश कांदळगावकर, ईशान सदाशीव सागवेकर, निनाद गणपत मोंडकर, रिषभ श्रीधर खराडे, हार्दिक सतिश टिकम, वेदांत सदाशिव सागवेकर, नैतिक धोंडी कांदळगावकर, रोहित बाळकृष्ण वरक, भुवन नरेंद्र नागवेकर, देवेश सीताराम पराडकर, आर्यन चंद्रशेखर कुबल या बाळगोपाळांनी गणेशोत्सवात गणेश भजने करून जमा झालेला निधी गरजू व्यक्तींना मदत म्हणून दिला. त्यामुळे त्या कुटुंबाचा आर्थिक भार काही प्रमाणात हलका झाला आहे. यापुर्वी सुद्धा या बाळगोपाळांनी गावातील निराधार आणि गरजु व्यक्तींना अशा उपक्रमातून आर्थिक मदत केली होती.
