*💫मालवण दि.२६-:* मालवण धुरीवाडा येथील अल्पवयीन मुलीला फुस लावून तिचे अपहरण केल्याप्रकरणी जंगबहादूर प्रसाद (वय २०, रा. बिहार) या युवकाविरोधात मालवण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्या अल्पवयीन मुलीच्या आईने मालवण पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. बुधवारी सकाळी मुलीचे आई वडील नांदगाव येथे आपल्या नातेवाईकाच्या बाराव्या दिवसाच्या कार्यासाठी गेले होते. यावेळी मुलीने तिच्या छोटी बहिणीला आपण बाजारात जाते असे सांगून कपडे व कागदपत्रे घेऊन घरातून बाहेर पडली. ती सायंकाळ उशिरा पर्यंत घरात न परतल्याने तिच्या आईने मालवण पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. मालवणात राहत असलेल्या बिहार येथील जंगबहादूर प्रसाद या युवकाशी संबंधित मुलीचे प्रेमसंबंध होते. वर्षभरापूर्वी ती त्याच्या बरोबर गेली होती. मात्र आईवडिलांनी तिचा शोध घेऊन परत घरी आणले होते असेही आईने तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारी नुसार मुलीला फुस लावून तिचे अपहरण केल्या प्रकरणी संशयित जंगबहादूर प्रसाद याच्याविरोधात मालवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी बिहारी युवकावर गुन्हा दाखल….
