संजय नाईक यांच्या जाण्याने बहूआयामी व अष्टपैलू व्यक्तिमत्व हरपले…

कट्टा येथील शोकसभेत मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना..

⚡मालवण ता.०८-: चांगल्या लोकांनाच देव स्वतःकडे लवकर बोलावून घेत असतो. सर्वांच्या हृदयात आपली एक जागा निर्माण करणाऱ्या संजय नाईक यांचे जाणे ही नियतीने केलेली मोठी चूक आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार आणि राजकीय अशा विविध क्षेत्रात स्वतःला झोकून देत काम करणाऱ्या संजय नाईक यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. संजय नाईक यांच्या रूपाने एक अष्टपैलू व बहूआयामी व्यक्तिमत्व हरपले आहे, त्यांचे कार्य आपण सर्वांनी पुढे सुरु ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना कट्टा येथे आयोजित शोकसभेत व्यक्त करण्यात आल्या.

कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच पेंडूर गावचे माजी सरपंच संजय नाईक यांचे ३० जून रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज सायंकाळी कट्टा येथील ओम गणेश साई मंगल कार्यालय माडये हॉल येथे शोकसभेचे आयोजन कट्टा पंचक्रोशी ग्रामस्थ व संजय नाईक मित्रमंडळ यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नाईक यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मामा माडये, संजय पेंडुरकर, ऍड. रुपेश परुळेकर, व्हिक्टर डॉन्टस, अशोक सावंत, दीपक भोगटे, गणेश वाईरकर, संतोष साटविलकर, संजय वेतुरेकर, सुरेश चौकेकर, श्री. कानोरकर, डॉ. सोमनाथ परब, जयेंद्रथ परब, प्रदीप मिठबावकर, समीर चांदरकर, सुमित सावंत आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी डॉ. सोमनाथ परब यांनी संजय नाईक हे विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि कुटुंबवत्सल व्यक्ती होते, नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व आणि दातृत्व या गुणांनी त्यांनी सर्वांच्या मनात आपली जागा निर्माण केली होती, अशी भावना व्यक्त केली. यावेळी संजय वेतुरेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना संजय नाईक यांचा जिल्ह्यातील शैक्षणिक चळवळीत सिंहाचा वाटा होता, त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांनी अनेक विद्यार्थी व व्यक्तींना मदत केली, मात्र त्याची कधीही वाच्यता व प्रसिद्धी केली नाही, असे सांगितले. व्हिक्टर डान्टस यांनी संजय नाईक हे अनेक व्यापात असतानाही कायम हसतमुख असायचे, त्यांनी आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे नाव अमर केले अशी भावना व्यक्त केली. सुरेश चौकेकर म्हणाले, नाईक यांनी दोन वर्षाच्या मुख्याध्यापक पदाच्या काळात नाईक यांनी वराडकर हायस्कुलचा नावलौकिक वाढविला, मुख्याध्यापक पदाला त्यांनी न्याय दिला, नाईक यांनी कायम दुसऱ्यांना मोठे केले, असेही चौकेकर म्हणाले.

संजय नाईक यांच्या सारख्या चांगल्या व्यक्तीच्या जाण्याने चांगल असणं आणि चांगल काम करणं हे नियतीच्या दृष्टीने चुकीचे आहे का असा प्रश्न पडतो, नाईक यांनी आपली विचारधारा संपूर्ण पंचक्रोशीसाठी दिली, राजकीय क्षेत्रातही नाईक यांच्या जाण्याने न भरून निघणारे नुकसान झाले आहे अशी भावना संतोष साटविलकर यांनी व्यक्त केली. शिक्षक श्री. कानोरकर यांनीही भावनाविवश होत नाईक यांच्या रूपाने आपला सहकारी व भाऊ गमावला आहे, असे सांगितले. ऍड. रुपेश परुळेकर म्हणाले, संजय नाईक यांनी कलिंगड लागवड आणि दुग्ध सहकारी सहकारी संस्था यांच्या माध्यमातून पेंडूर मधील शेतकऱ्यांना नवीन दिशा दाखवली, त्यांच्या जाण्याने प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून ते गेले आहेत, असेही परुळेकर म्हणाले.

यावेळी मामा माडये यांनी नाईक यांच्या जाण्याने भंडारी समाजाचा हिरा निघून गेला आहे अशी भावना व्यक्त केली. अशोक सावंत यांनी संजय नाईक यांचे कार्य आपण सर्वांनी मिळून पुढे सुरु ठेवूया, तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेलं असे सांगितले. शिक्षक संजय पेंडुरकर यांनी नाईक यांच्या शाळेतील आठवणींना उजाळा देत त्यांच्या जाण्याने आपला जिवलग सहकारी मित्र हरपला आहे, अशी भावना व्यक्त केली. प्रदीप मिठबावकर यांनी नाईक यांच्या जाण्याने बहूआयामी आणि तळमळीने काम करणारी व्यक्ती आपल्यातून निघून गेली आहे असे सांगितले. यावेळी जयेंद्रथ परब यांनीही नाईक यांच्या आठवणी जाग्या करत भावना व्यक्त केल्या. सूत्रसंचालन संजय पेंडुरकर यांनी केले, आभार प्रदीप मिठबावकर यांनी मानले.

You cannot copy content of this page