श्रीपाद गिरसागर:मालवणात संस्कृत विषयातील गुणवंतांचा सन्मान..
⚡मालवण ता.२३-: सध्याच्या काळात विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाकडेही लक्ष दिले पाहिजे, मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे. आपल्या अंगी शिस्त बाणावली पाहिजे. तरच आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटे व अडचणी यावर आपण सहज मात करू शकतो, असे प्रतिपादन माजी प्राचार्य मेजर श्रीपाद गिरसागर यांनी येथे बोलताना केले.
नगर वाचन मंदिर मालवण आणि डॉ. नारिंग्रेकर कुटुंबिय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण शहरातील काही प्रशालांमधील मराठी आणि निम मराठी माध्यमातुन सन २०२४ यावर्षी दहावी परिक्षेमध्ये संस्कृत विषय घेऊन अव्वल आलेल्या चार विद्यार्थी आणि चार विद्यार्थिनींना अनुक्रमे रू.१० हजार, रू. ५ हजार, रू. ३ हजार, आणि २ हजार एवढ्या रक्कमेची प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व श्री देवी सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मेजर श्रीपाद गिरसागर, तसेच प्रमुख वक्ते संस्कृत विषयाचे अभ्यासक व टोपीवाला हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. रघुनाथ शेवडे, देणगीदार विजय नारिंग्रेकर यांच्या भगिनी सुलभा नारिंग्रेकर तसेच नगरवाचन मंदिरचे ग्रंथपाल संजय शिंदे व कर्मचारी, वाचक उपस्थित होते.
ग्रंथपाल संजय शिंदे यांनी प्रास्ताविक करत ग्रंथ भेट व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी बोलताना प्रमुख वक्ते श्री. शेवडे यांनी विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात मिळविलेले यश कौतुकास्पद आहे, श्रीमद्भगवतगीतेतील १८ अध्यायातील वचनांप्रमाणे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल करायला पाहिजेत. म्हणजे त्याचा लाभ विद्यार्थ्यांना भावी आयुष्यामध्ये निश्चितपणे होईल, असे सांगत विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांनी, पालक व शिक्षकांनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक ग्रंथपाल श्रेया चव्हाण यांनी केले.
