संजय बोगटे यांची मागणी: आचारसंहितेचे कारण नको..
कुडाळ : कुत्रे चावून लोकांचे आरोग्य बिघडूदेत की लोकांचा प्राण जावुदेत आम्ही आचारसंहिता पाळणार, निविदा प्रसिद्धी करणार, टेंडर ओपन करणार… तो पर्यंत लोकं मेले तरी चालतील…..अजब तुमचा कारभार ! अशा शेलक्या शब्दात टीका करून माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे यांनी कुडाळमध्ये भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नगर पंचायतकडे केली आहे.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, ह्यापूर्वी काहीजणांनी भटक्या कुत्र्यांबाबत नगरपंचायत कुडाळ यांना निवेदन दिलेले होतें. त्यानुसार काहिही झाले नाही. कुत्र्यांचा पुन्हा त्रास सूरू झाला. पुन्हा निवेदन दिले. चर्चा झाली. परंतु कार्यवाही शून्य..आचारसंहितेचे कारण दिले गेले, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना कळविले असे मुख्याधिकारी नगरपंचायत कुडाळ यांचे म्हणणे होतें. पूढे काय झालं काय माहित नाही. .
आता परत कुत्र्यांनी लोकांना चावायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता लोकांनी कुत्र्यांकडून चावून घ्यायचे, दवाखान्यात जावून उपचार करवून घ्यायचे, प्रसंगी प्राण द्यायचे एव्हढेच बाकी राहिले आहे. कारण आचारसंहिता चालु आहे…. जनतेचा जीव स्वस्त झालाय….!!!!
त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने आचार संहितेचा बाऊ न करता जनतेच्या आरोग्याच्या, जीविताचा विचार करून संबधित यंत्रणेने तात्काळ उपययोजना करावी अशी मागणी संजय भोगटे यांनी केली आहे.