आमदार नीतेश राणे यांचा इशारा…
⚡कणकवली ता.०३-: उद्धव ठाकरे, संजय राऊत हे लंडनमध्ये बसून भाजपासोबत, एनडीएमध्ये येण्यासाठी मीटिंग घेत वाटाघाटी करतात आणि भारतात येऊन मोदींवर टीका करतात. हा दुटप्पीपणा त्यांनी बंद करावा. नाहीतर लंडनमधील बैठकीचे सगळे फोटो, व्हिडीओ जाहीर करू, असा इशारा भाजप प्रवक्ते आमदार नीतेश यांनी दिला. तर सांगली लोकसभा मतदारसंघाचे निमित्त सांगून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचा गौप्यस्फोट ही त्यांनी केला.
येथील प्रहार भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना श्री. राणे म्हणाले, अपेक्षेप्रमाणे विरोधकांची आणि इंडिया आघाडीची रडारड सुरू झाली आहे. संजय राऊत यांना निवडणूक आयोग म्हणजे भाजपचा एक्सटेंडेड हात आहे हे 2024 मध्ये जाणवले. 2014 आणि 2019 मध्ये शिवसेना भाजपसोबत होती तेव्हा त्यांना असे काही वाटले नव्हते. पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच ध्यानधारणा केली नाही. 2019 मध्येही त्यांनी देशातील प्रचार संपल्यावर ध्यानधारणा केली होती. त्यावेळी मोदींचे फोटो लावल्यामुळे उबाठाचे 18 खासदार निवडून आले होते.
इंडिया आघाडीशी उबाठा सेना प्रामाणिक नाही. राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर खोटे प्रेम उबाठा सेना दाखवत आहे. लंडनमध्ये उद्धव ठाकरे यांनी कुठल्या हॉटेलमध्ये बसून एनडीएमध्ये घेण्याबाबत बोलणी केली, त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावे लागेल. सांगलीमध्ये संजय पाटील जिंकणार आहेतच. पण, त्याच सांगलीच्या जागेचेनिमित्त करून लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे राणे म्हणाले. लंडनच्या बैठकीत कोणी कुठले कपडे, कोणती टोपी घातली होती, त्याचे सगळे फोटो आणि व्हिडिओ जाहीर करणार असल्यााोही ते म्हणाले.
एका बाजूला भाजपसोबत येण्यासाठी तडफडायचे, बिनशर्थ पाठिंबा द्यायचा आणि दुसरीकडे भारतात आल्यानंतर मोदींवर टीका करायची हे सगळे प्रकार थांबवा. अन्यथा तुमचे पितळ उघडे पाडू. देशहीत, हिंदूधर्म हीत, राष्ट्रहीतासाठी काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. उबाठा सेना एनडीएमध्ये दाखल होत असेल तर पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असेही राणे म्हणाले.
