⚡मालवण ता.०३-:
काही दिवसांपूर्वी मालवण बंदर जेटी येथील समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला वाचविणाऱ्या वरद सापळे, रूद्र गांवकर, अंगद गांवकर, हर्ष कुबल या पोहण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांचा व त्यांचे प्रशिक्षक प्रफुल्ल गवंडे यांचा शिवसेना शिंदे गट युवासेनेतर्फे सत्कार करण्यात आला. मुलांच्या या धाडसी कार्याचे व त्यामागे मेहनत घेणाऱ्या गवंडे यांच्या कार्याचे यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.
शिवसेना (शिंदे गट) युवासेना मालवण – सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने तसेच किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा सत्काराचा मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरात पार पडला. यावेळी शाल व श्रीफळ देऊन मुलांचा व प्रशिक्षक श्री. गवंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. गवंडे यांनी त्यांच्या पोहण्याच्या तालमीमध्ये मुले कशी तयार झाली, तसेच बुडणाऱ्या पर्यटकाला वाचविण्याचा प्रसंग कथन करत मुलांचे कौतुक केले. तसेच मुलांच्या या कार्याची दाखल घेऊन सत्कार केल्याबद्दल युवासेनेचे आभार मानले.
मूर्ती लहान पण कीर्ती महान या म्हणीला साजेसे काम या मुलांनी केले असून त्यांचे कर्तृत्व मालवणसाठी अभिमानाची बाब आहे, अशा शब्दात युवासेना पदाधिकाऱ्यांनी मुलांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शिंदे शिवसेनेचे माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवासेना जिल्हा प्रमुख ऋत्विक सामंत, युवती सेना जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर ,युवासेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर, युवती सेना मालवण शहर प्रमुख प्रियांका मेस्त्री अन्य शिवसैनिक तसेच पालक अरूण चोपडेकर, करुणा गांवकर आदी उपस्थित होते.
