उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांचे आवाहन..
सावंतवाडी दि.२ जून ( प्रतिनिधी)
लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीनंतर समाजात तणाव, शांतता भंग होईल असे कुठे वातावरण असेल तर पोलिसांना माहिती दिली तर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे कार्य आपल्या सहकार्याने करता येईल असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांनी केले. दरम्यान अंमली पदार्थ, गोवा बनावट दारूची माहिती देण्याचे त्यांनी आवाहन केले.
सावंतवाडी पोलीस ठाण्यात शांतता समितीच्या बैठकीत उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक तानाजी नरनावर उपस्थित होते.
शांतता समिती सदस्य माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ,पत्रकार सिताराम गावडे, सामाजिक कार्यकर्ते अँड नकुल पार्सेकर, पत्रकार अभिमन्यू लोंढे,ऑगोस्तीन फर्नांडिस, हिदायततुल्ला खान, काँग्रेसचे तौकीर शेख आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सदस्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. काही भागात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान झाले. मतदानापूर्वी वाद विकोपाला गेले. त्यामुळे मतमोजणी नंतर गालबोट लागू नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली पाहिजे असे सांगितले त्यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे व पोलीस निरीक्षक तानाजी नरनावर म्हणाले, सोशल मीडियावरून कोणीही अफवा पसरवून नये. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले तर पोलिस कारवाई करतील. मतमोजणी नंतर गालबोट लागू नये म्हणून सर्वांना आमचं आवाहन आहे, त्यांनी याबाबत काही कुणकुण लागली तर पोलिसांना माहिती द्यावी. मतमोजणीनंतर समाजात वाद विवाद होणार नाही अशी भूमिका प्रत्येक सजग नागरिकांनी घ्यावी.
शांतता भंग होणाऱ्या ठिकाणी पोलिसांचे लक्ष असले पाहिजे म्हणून बेकायदेशीर दारू, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या ठिकाणांवर पोलिसांचे लक्ष असले पाहिजे. गोवा बनावट दारूची खुलेआम विक्री सुरू असून अंमली पदार्थ देखील सराईत पणे विक्री होत आहेत. काळ्या काचा असणाऱ्या काही चार चाकी गाड्या तपासल्या जाव्यात अशी मागणी या चर्चेत करण्यात आली.
लोकसभा निवडणूक मतदान मोजणी नंतर गालबोट लागू नये म्हणून सर्वांनी शांतता अबाधित राहीली पाहिजे म्हणून दक्षता घ्यावी. तसेच कुठं काही घडणार असेल तर पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन यावेळी श्री. कांबळे व श्री नरनावर यांनी केले.
फोटो
पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे व पोलीस निरीक्षक तानाजी नरनावर आणि समिती सदस्य माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व मान्यवर
