विद्यार्थ्यांनी आपले छंद जोपासावे…

प्रणय तेली यांचे आवाहन:तळेरे येथे हस्ताक्षर स्पर्धेचे बक्षीस वितरण..

कणकवली ता.२५-: आपण करीत असलेल्या कामामुळे आपली ओळख होणे महत्वाचे असून आपण आपले छंद जोपासले पाहिजेत. विचार माणसाला मोठे करू शकतात आणि तेच पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असतात. यशस्वी आयुष्य जगण्यासाठी धेय्य, आवड, निरीक्षण, जिद्द आणि प्रत्येक क्षणी जाणीव असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संगीत व गीतकार प्रणय शेट्ये यांनी केले.
तळेरे येथील श्रावणी कंप्युटर आणि अक्षरोत्सव परिवाराच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात श्री. शेट्ये बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार, कवी तथा अभिनेते प्रमोद कोयंडे, तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराचे अध्यक्ष उदय दुधवडकर, संजय खानविलकर, स्पर्धेचे परीक्षक अभिजित राणे, श्रावणी कंप्युटरचे संचालक सतीश मदभावे, अक्षरोत्सव परिवार प्रमुख निकेत पावसकर आदी उपस्थित होते.
आपण सर्वच मोठे व्हा, आई वडिलांचे नाव मोठे करा, असे सांगत अनिल सुतार यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी विनोदवीर दादा कोंडके यांच्या विविध भूमिका सादर करत सभागृहात हास्यकल्लोळ उडविला. अभिजित राणे यांनीही हस्ताक्षराबाबत मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. आरंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला प्रणय शेट्ये व अनिल सुतार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रास्ताविक निकेत पावसकर यांनी केले. सूत्रसंचालन रोशनी बागवे यांनी केले. आभार सतीश मदभावे यांनी मानले. या कार्यक्रमाला स्पर्धक व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बॉक्स
पुढील स्पर्धेत सहभागासाठी आवाहन
यापुढील स्पर्धेची घोषणा निकेत पावसकर यांनी यावेळी केली असून यावर्षी संवेदनशील कवी, अभिनेता संकर्षण कर्‍हाडे यांच्या सामाजिक विषयावरच्या दोन कविता स्पर्धेसाठी देण्यात आल्या आहेत. ही स्पर्धा 1 ते 4 थी, 5 ते 8 वी व 9 वी ते 12 वी अशा तीन गटात होणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

You cannot copy content of this page