आम. वैभव नाईक; मेरिटाईम बोर्डाकडे केलि मागणी..
मालवण : (प्रतिनिधी)
ऐन पर्यटन हंगामात गेले महिनाभर लोकसभा निवडणूकीची धामधूम, त्यामुळे पर्यटकांची कमी झालेली संख्या आणि आता संपत आलेला पर्यटन हंगाम यामुळे मालवणातील पर्यटन व्यावसायिक आधीच चिंताग्रस्त असताना मेरीटाइम बोर्डाने नियमावर बोट ठेवत पावसाळी हंगामासाठी २५ मे पासून जालक्रीडा व सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याच्या दिलेल्या सूचनेमुळे पर्यटन व्यवसायिक हवालदिल झाले असून जलक्रीडा व किल्ला होडी वाहतुकीस मुदतवाढ मिळावी अशी मागणी व्यवसायिकांमधून होत असतानाच आम. वैभव नाईक यांनी याची दखल घेत सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक व जलक्रिडांना १० जूनपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी आम. नाईक यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे.
मालवण मधील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला हा पर्यटनाचा केंद्रबिंदू राहिला असून विविध जलक्रीडांना पर्यटकांची मोठी पसंती आहे. सिंधुदुर्ग किल्ला व जलक्रीडा हे येथील पर्यटनाचे मुख्य आधारस्तंभ बनले आहेत. दरवर्षी मेरिटाइम बोर्डाकडून २५ मे पासून किल्ला वाहतूक व जलक्रीडा पावसाळी हंगामासाठी बंद ठेवण्यात येतात. मात्र यापूर्वी काही वेळा पर्यटन व्यवसायिकाकांच्या मागणीनुसार ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु गतवर्षी पासून मेरिटाईम बोर्डाने या बंदीची कडक कार्यवाही करण्यात आली. यावर्षीही याबाबतच्या सूचना मेरिटाईम बोर्डाने दिल्या असल्याने पर्यटन व्यवसायिकांच्या हाती काही मोजके दिवस शिल्लक राहिले आहेत.
या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी या प्रश्न लक्ष घालत महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.
दरवर्षी किल्ले प्रवासी वाहतूक व जलवाहतूक व सागरी सहासी क्रिडा २५ मे रोजी बंद करण्याच्या सुचना देण्यात येतात. गेल्या वर्षी मान्सुन १० जुन पर्यंत रखडल्याने २५ मे नंतर येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाला होता. यावर्षी देखील हवामान खात्याने १२ जुन पर्यंत मान्सुन येणार नसल्याचे जाहिर केले आहे. तरी यावर्षीची किल्ले प्रवासी वाहतूक व जलवाहतूक व सागरी साहसी क्रिडा १० जुन २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी या पत्रात आ. नाईक यांनी केली आहे.
