मडूरा श्री देवी माऊली वर्धापनदिन सोहळा उत्साहात संपन्न…

⚡बांदा ता.०८-: मडूरा येथील ग्रामदैवत श्री देवी माऊली वर्धापन दिन सोहळा उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. देवीचे दर्शन घेण्यासाठी तसेच ओटी भरण्यासाठी महिला भाविकांची गर्दी उसळली होती.

     यानिमित्त सकाळी श्रींची नित्य पूजाअर्चा व अभिषेक झालेत. ब्राम्हणांच्या मंत्रोच्चारात फोंडा – मडकई येथील पुरोहित गौरव धैसास आणि बंधूंनी श्री माऊलीची गंधपूजा केली. त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न झाले. सायंकाळी श्री देवी माऊली भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

     रात्री शिमगोत्सवातील नाटकात योगदान दिलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारांना विशेष कार्यक्रमात आदर्श तरुण हौशी नाट्यमंडळ परबवाडी या संस्थेतर्फे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यानंतर मंडळाचा ‘संगीत रुक्मिणी स्वयंवर’ हा संगीत नाट्यप्रयोग सादर झाला. या सोहळ्यासाठी मुंबई, पुणे, गोव्यासह विविध भागातील चाकरमानी व माहेरवाशिणी उपस्थित होते. देवस्थान समितीमार्फत सोहळ्याचे उत्तम नियोजन करण्यात आले होते.

फोटो –
गंधपूजे नंतर दिसणारे श्री देवी माऊलीचे मनोहारी रूप.

You cannot copy content of this page