मुख्यमंत्री मदतकक्ष कुडाळ तालुकाप्रमुख अरविंद करलकर यांचे वक्तव्य..
⚡कुडाळ ता.२७-: कुडाळ-मालवण मतदारसंघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तालुक्यातील महावितरणचे कंत्राटी कर्मचारी धनंजय फाले यांच्या मृत्यूप्रकरणी फाले कुटुंबीयाला मुख्यमंत्री सहायता निधीतून १ लाख रुपयांची मदत मिळाल्याचे प्रसिद्ध केले होते. मात्र, याबाबत मुख्यमंत्री सहायता मदतकक्षाचे कुडाळ तालुकाप्रमुख अरविंद करलकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, मी स्वतः मुख्यमंत्री मदत कक्षाचा कुडाळ तालुकाप्रमुख आहे.
आजपर्यंत कुडाळ तालुक्यातील १२ प्रकरणे मुख्यमंत्री मदत कक्षातून मार्गी लावली आहेत. तसेच सध्या पिंगुळी गावातील गणेश अर्जुन शेटकर यांना सुद्धा १ लाखांची मदत जाहीर झाली असून ती खात्यातही जमा झाली आहे. अरविंद करलकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीकास्त्र सोडताना म्हटले आहे की, मुख्यमंत्री हे शिवसेनेचे आहेत. आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना शिंदे गटावर काही दिवसांपूर्वी जोरदार टीका केली होती. कुडाळ तालुक्यातील विकासकामांचे श्रेय आमदार वैभव नाईक घेत आहेत. मात्र, ही विकासकामे मुख्यमंत्र्यांचा योजनेतून होत आहेत, हे त्यांनी विसरू नये असा टोलाही अरविंद करलकर यांनी आमदार वैभव नाईक यांना लगावला आहे.
वैभव नाईक यांनी स्वतः आणलेल्या विकासकामांचे भूमिपूजन करावे. तुम्ही जे शिवसेना शिंदे गटावर आरोप केलेत याचा फटका तुम्हाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बसेल. येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला विजय पक्का असून आमदार वैभव नाईक यांचा कमीत कमी ३५ हजार मतांनी पराभव होईल ही काळा दगडावरील पांढरी रेघ आहे असा विश्वासही अरविंद करलकर यांनी व्यक्त केला. पुन्हा आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना शिंदे गटावर आरोप केल्यास त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असेही अरविंद करलकर यांनी म्हटले आहे.
