Headlines

कर्लीसह कालावल खाडीतील वाळू लिलावाचा मार्ग मोकळा..

⚡कुडाळ ता.२०-: राज्याचे बंदर तथा युवक कल्याण व क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्ली आणि कालावल खाडीतील वाळू लिलावास एमएमबीने परवानगी दिली आहे. यावर्षी नवीन शासनाच्या धोरणानुसार या भागात वाळू मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे एमएमबीने या दोन्ही खाडीतील वाळू उत्खननास सर्वे करून परवानगी दिली नव्हती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष अबिद नाईक आणि जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर (राष्ट्रवादी अजित पवार गट) पदाधिकारी यांनी
प्रांत कलुशे यांना भेटून या भागातील वाळू लिलाव लवकरात लवकर करावा अशाप्रकारचे निवेदन दिले होते.

त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्गच्या वतीने काका कुडाळकर यांनी राज्याचे बंदरे, युवक कल्याण व क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची २२ नोव्हेंबर रोजी भेट घेऊन निवेदनाद्वारे या ठिकाणी वाळू लिलाव होणे आणि अधिकृतरित्या जनतेला वाळू मिळावी यासाठी पत्र दिले होते. याचवेळी मंत्री बनसोडे यांनी संबंधित खात्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, एमएमबीच्या हायड्रोग्राफर यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना या दोन्ही खाडीमधील वाळू उत्खनन करण्याबाबत अधिकृतरित्या परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच या दोन्ही कर्ली आणि कालावल खाडीमध्ये वाळू लिलावाची प्रक्रिया होऊन जनतेस अधिकृतरित्या वाळू मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. जिल्ह्याच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिल्याबद्दल मंत्री संजय बनसोडे यांचे कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page