कुंभारमाठ – वेंगुर्ला सागरी महामार्गावर दोन चारचाकी गाड्यामध्ये समोरासमोर अपघात….

पाच जण जखमी:अपघातात दोन्ही गाड्यांच मोठे नुकसान..

⚡मालवण ता.०८-: कुंभारमाठ – वेंगुर्ला सागरी महामार्गावर आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दोन चारचाकी गाड्यामध्ये समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. या जखमीना १०८ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात दोन्ही गाड्यांचेही मोठे नुकसान झाले.

कुडाळ माड्याचीवाडी येथील मंडळी इस्टीम गाडी (क्र. एम एच ४३ एन ७०५०) मधून मालवणात लग्न समारंभासाठी आले होते. लग्न समारंभ आटोपून सायंकाळी ते पुन्हा कुडाळच्या दिशेने निघाल्यावर कुंभारमाठ येथे कुंभारमाठ – वेंगुर्ला सागरी महामार्गावर गाडी आली असताना समोरून येत असलेली वेंगुर्ला येथून श्रावण च्या दिशेने जाणारी आर्टिगा गाडी (एम एच ०२ डीएस ११०६) यांच्यात समोरासमोर धडक बसून सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. या अपघातात इस्टीम गाडीतील दशरथ धोंडू तेली (वय ५५) व चंद्रशेखर मधुसूदन परब (वय ५८) (दोन्ही रा. माड्याचीवाडी, कुडाळ) हे दोघे तर अर्टिगा गाडीतील सुनीता महेश पवार (वय ५८), सिद्धेश महेश पवार (वय ३३) सचिन गणपत पवार (वय ३६) ( सर्व रा. श्रावण) हे जखमी झाले या अपघातात दोन्ही गाड्यांचेही मोठे नुकसान झाले.

अपघात घडल्याचे कळताच कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्य राहुल परब, माजी सभापती मधुकर चव्हाण, माजी उपसरपंच श्री. चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी सिद्धेश गावठे, ग्रामस्थ सुनील वस्त व अन्य नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्ताना मदत करीत जखमींना तत्काळ १०८ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक बळीराम सुतार, हेडकाँस्टेबल धोंडू जानकर व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली.

जखमींवर मालवण ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्यावर यातील तिघा जखमीना अधिक उपचारासाठी ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तर एकाला कुडाळ येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

You cannot copy content of this page