आग लावून नुकसान केल्याप्रकरणी एकाची निर्दोष मुक्तता…

⚡मालवण ता.०६-: गवत वाढलेल्या मोकळ्या माळरानावर आग लावून ती वेळीच न विझविल्याने फिर्यादीच्या आंबा, काजू कलम बागेचे जळून नुकसान केल्याच्या आरोपातून आरोपी देवीदास लक्ष्मण खडपे (५०, रा. वायरी-भूतनाथ) याची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड. स्वरुप नारायण पई यांनी काम पाहिले.

याबाबत आरोपीने साळकुंभा नांदरुख येथील त्यांच्या जमिनीची मोजणी असल्याने साफसफाई करताना गवताला आग लावली होती. आरोपीला त्याचे जमिनीच्या शेजारी शंकर सुंदरनाथ किडये यांची आंबा, काजू कलम बाग असल्याचे व माळरानावर लावलेली आग विझविणे कठीण असते हे माहिती असूनही बेफिकिरीने मोकळ्या रानावर आग लावली. ती वेळेत न विझविल्याने फिर्यादीच्या बागेत आग पसरून बागेतील कलमे, ठिंबक सिंचनचे पाईप व पत्र्याच्या शेडचे जळून नुकसान झाले, अशी फिर्याद मालवण पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून १६ फेब्रुवारी २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरून पोलिसांनी मालवण न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याकामी सरकार पक्षातर्फे ४ साक्षीदार तपासण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

You cannot copy content of this page