अन्यथा आठ दिवसात वृक्षारोपण करून निषेध आंदोलन:शिवसेना ठाकरे गटाचा प्रशासनाला इशारा
आंबोली,ता.१९: येथील घाटात खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे.दुचाकीस्वारांची कंबर रस्त्यावरून जाताना जात असून गाड्या खिळखिळ्या होत आहेत.चारचाकी गाड्याचा देखील दुरुस्ती खर्च वाढत असून वाहतूकदार मेटाकुटीला आले आहेत.स्थानिक आमदार आणि शिक्षण मंत्री या रस्त्यावरून कित्येकवेळा येऊन देखील रस्त्याची दुर्दशा आहे. प्रशासनाने देखील डोळेझाक केली आहे.येत्या आठ दिवसात रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास प्रशासनाचा निषेध करण्यासाठी वृक्षारोपण करून रस्त्यावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंबोली शिवसेना (ठाकरे गट) बबन गावडे,अनिल चव्हाण,संतोष पाताडे यांनी दिला आहे.
आंबोली घाटातील रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे.मोठं मोठे खड्डे पडल्यामुळे दुर्दशा झाली आहे.पावसाळ्याच्या तोंडावर अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम ठेकेदाराने केले.घाटातील कामात हैयगय करून ठेकेदाराला मलिदा खाण्यासाठी स्टाफ कमी आहे असे सांगून संधी देण्यात आली.यापूर्वी बोगस काम केलेल्या ठेकेदारांनाच कामे मिळत असून त्यांच्या कामावर निगराणी,क्वालिटी कंट्रोल,दर्जा,आणि सुपरवायझरिंग अशा कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसून बिल दिली जातात त्यामुळे ठेकेदारांची मुजोरी बोगस कामे करण्यात वाढली आहे.त्यामुळे अत्यंत सुमार दर्जाचे निकृष्ट काम होऊन मोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे अनेक अपघात होतात शिवाय दुरुस्तीचा खर्च वाढत असून गाड्या खिळखिळ्या होत आहेत.कंबरेचे दुखणे वाढत आहे. स्थानिक आमदार दीपक केसरकर हे कॅबिनेट मंत्री आहेत.आंबोलीतून या रस्त्याने जातात.मात्र रस्त्याची दुर्दशा तशीच आहे. रस्त्यासाठी निधी आणल्याची कोट्यवधींची आकडेवारी दिली जाते मात्र ठेकेदारांच्या घशात हा निधी जातो त्यावर कोणाचं ही नियंत्रण नसते. प्रशासनाने देखील डोळ्यावर हात ठेवले आहे.गतिमान सरकार म्हणून भूषण सांगणाऱ्यांची रस्त्यांची तसेच कामांची दुर्दशा जनतेला दिसत आहे. सध्या रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे पर्यटक देखील या मार्गे खूप कमी गेले.पर्यटनाला देखील याचा फटका बसला. आंबोली आंतरराष्ट्रीय पर्यटन अशा वलग्ना झाल्या प्रत्यक्षात इथली अवस्था बेकार आहे. निदान वाहतुकीचा रस्ता तरी सुस्थितीत हवा. त्यामुळे शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा आठ दिवसात रस्त्यात वृक्षारोपण करून निषेध करण्यात येईल तसेच निषेध आंदोलन रस्त्यावर करण्यात येईल असा इशारा शिवसेनेतर्फे(ठाकरे गट) विभागीय अध्यक्ष बबन गावडे, अनिल चव्हाण,संतोष पाताडे, शशी सावंत,सत्यवान गावडे,दादा नाटलेकर,शंकर गावडे आदींनी दिला आहे.
