चाफेखोल सरपंच उमेदवार शिवसेनेचा…

भाजप तालुकाध्यक्ष चिंदरकर यांनी जबाबदारीने वक्तव्य करावे:विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे यांचा सल्ला..

मालवण (प्रतिनिधी)

भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी आचरा ग्रामपंचायतीवर आपले उमेदवार निवडून येतील असे सांगतानाच चाफेखोल ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच पदाच्या उमेदवार रविना घाडीगावकर या सुद्धा भाजपच्या उमेदवार असल्याचे वक्तव्य केले. मात्र रविना घाडीगावकर या शिवसेनेच्या असून शिवसेना – भाजप युतीच्या त्या उमेदवार असून यापूर्वी चाफेखोलवर शिवसेनेचीच सत्ता होती याचा धोंडी चिंदरकर यांना विसर पडला आहे, तालुकाध्यक्ष पदावर असलेल्या धोंडी चिंदरकर यांनी माहिती घेऊन जबाबदारीने वक्तव्ये करावीत, असा सल्ला शिवसेनेचे कुडाळ मालवण क्षेत्रप्रमुख बबन शिंदे व मालवण तालुकाध्यक्ष राजा गावकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

मालवण येथील शिवसेना (शिंदे गट ) पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. त्यावेळी बबन शिंदे, राजा गावकर, नीलम शिंदे, रविना घाडीगावकर, भारती घारकर, गीता नाटेकर, राजेश घाडीगावकर, मनोज शेवरेकर, यशवंत घाडीगावकर, संजय देसाई आदी उपस्थित होते.

यावेळी बबन शिंदे म्हणाले, आचरा ग्रामपंचायत निवडणूक आम्ही भाजप शिवसेना युती म्हणून लढवत आहोत. आचऱ्यातील युती धर्म आम्ही पाळला आहे. चाफेखोल ग्रामपंचायतीवर यापूर्वी शिवसेनेचीच सत्ता होती. सरपंच व पाच सदस्य हे शिवसेनेचे होते. चाफेखोल ग्रामपंचायत निवडणुकीतही शिवसेना – भाजप युती म्हणूनच आम्ही लढत असताना सरपंच पदाच्या उमेदवार रविना घाडीगावकर या भाजपच्या आहेत असे तालुकाध्यक्ष असलेल्या धोंडी चिंदरकर यांनी सांगणे लाजिरवाणी गोष्ट आहे. वेळ पडल्यास आम्ही चाफेखोल मध्ये शिवसेनेची ताकद दाखवून देऊ. चिंदरकर यांना मध्ये मध्ये कावीळ होते त्यामुळे त्यांना सर्व पिवळे दिसू लागते, अशी टीका शिंदे यांनी केली.

यावेळी राजा गावकर म्हणाले, धोंडी चिंदरकर यांनी पावडर लावलेल्या गालांचे मुके घेण्याचे आता बंद करावे. तालुकाध्यक्ष सारखे जबाबदारीचे पद सांभाळणाऱ्या चिंदरकर यांनी माहिती न घेता अमुक उमेदवार भाजपचा आहे असे सांगू नये. विधाने करण्यापूर्वी पूर्ण माहिती घेऊन करावीत. रविना घाडीगावकर या आधीही शिवसेनेत होत्या, आजही आहेत व उद्याही शिवसेनेत राहतील, असेही गावकर म्हणाले.

You cannot copy content of this page