मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे व सचिव गुरुदास कुसगांवकर यांनी मांडली खंत..
⚡कणकवली ता.०४-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये दिवसेंदिवस अनेक प्रश्न निर्माण होत असून माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक त्रस्त होऊन तणावाखाली वावरत आहेत.शासन आणि प्रशासन यंत्रणेने याबाबत गांभीर्याने विचार करून शालेय समस्या समजून घेऊन त्या सोडवून हा तणाव कमी करावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे आणि सचिव गुरुदास कुसगांवकर यांनी केली आहे.
दररोज परिपत्रके, आदेश प्रशासकीय यंत्रणेकडून निघत आहेत आणि त्याची पुर्तता तात्काळ करा, उद्या करा अशी सूचना व्हाट्सऍपच्या माध्यमातून येत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती नाही. शिक्षकेतर भरती नाही. जिल्ह्यातील सुमारे 70शाळांमध्ये मुख्याध्यापक नाहीत. अनेक शाळांमध्ये लिपिक, शिपाई .नाहीत.विद्यार्थी संख्या नाही म्हणून पद गोठवणे, सावंतवाडी तालुक्यातील श्री. माऊली विद्यालय, डोंगरपाल ही तीन वर्गांची माध्यमिक शाळा जिल्ह्यातील पहिली एक शिक्षिकी माध्यमिक शाळा बनली आहे. मुख्याध्यापक तोच ,शिक्षक तोच. लिपिक तोच. सुट्टी घेता येत नाही. प्रशिक्षण, सभेला जायचे तर
शाळेचे काय? अलीकडे, नव साक्षरता अभियान, लोकसभा निवडणुक प्रशिक्षण, यु-डायस, सरल, प्रमोशन,अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती व त्यांच्या अटी, समाजकल्याण प्रस्ताव, एन एम एम एस फ्रेश, नुतनीकरण, ई बी सी, फीट इंडिया, कला उत्सव, पोषण आहार, क्रिडा स्पर्धा, पवित्र पोर्टल, seas परीक्षा, पदवीधर मतदारसंघ नोंदणी, शाळेत वारंवार नेटवर्क जाणे, लाॅगिन न होणे, विज्ञान प्रदर्शन, अभ्यासक्रम पूर्ण करणे, शिक्षक नसलेल्या शाळांमध्ये अतिरिक्त तासिका घेणे, लिपिक नसलेल्या शाळांमध्ये लिपिक काम, शिपाई नसलेल्या शाळांमध्ये साफसफाई, बेल ,पाणी यांची व्यवस्था करणे, शासनाचे बदलते आदेश, विविध समित्या,त्यांच्या सभा,विद्यार्थी वाहतूक आणि सुरक्षितता, ऑनलाईन जबाबदारी,सहशालेय उपक्रम, परीक्षा, मुल्यमापन, गुणवत्ता वाढ,बाह्य परीक्षा,विविध स्पर्धा संस्था, पालक, विद्यार्थी, समाज,शिक्षक,शिक्षकेतर,स्वयंपाकी,शिक्षण विभाग या घटकांचा समन्वय साधणे ,आर्थिक नियोजन करणे,संच मान्यता,आधार व्हॅलिड, इनव्हॅलिड विद्यार्थी जमवाजमव, ऑनलाईन दहावी-बारावी आवेदनपत्र, कोरोना काळापासून सुरु झालेला विद्यार्थी फोन वापर, विद्यार्थी शिस्त, काही ठिकाणी बाह्य यंत्रणेचा वाढता हस्तक्षेप, भौतिक सुविधा वाढवणे
या सारख्या अनेक व्यापामुळे माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक व्यस्त आणि त्रस्त होऊन तणावाखाली वावरत आहे.मुख्याध्यापकांच्या आरोग्यविषयक सुरशिक्षततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रभारी मुख्याध्यापक तर अगदी तारेवरची कसरत करून वैतागून गेला आहे. शासन आणि प्रशासन यंत्रणेने याबाबत गांभीर्याने विचार करून शालेय समस्या समजून घेऊन त्या सोडवून हा तणाव कमी करावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे आणि सचिव गुरुदास कुसगांवकर यांनी केली आहे.
