रियाज खान:मनोज जरांगे पाटील व समस्त मराठा समाजाच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा असल्याच केले जाहीर..
⚡बांदा ता.०३-: राज्यातील मिंधे सरकार हे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुचकामी ठरले आहे. मराठा समाजासोबत अल्पसंख्यांक समाजाच्या तोंडाला देखील या सरकारने पाने पुसण्याचीच कामे केली आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील व समस्त मराठा समाजाच्या भूमिकेला आमचा जाहीर पाठिंबा असल्याचे शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांनी सांगितले. त्यांनी पत्रक प्रसिद्ध करून आपली भूमिका जाहीर केली आहे.
खान यांनी पत्रकात म्हटले आहे की, मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांना आरक्षणसाठी दोनवेळा आंदोलन करावे लागले. हे राज्यातील सरकारचे अपयश आहे. राज्यात मराठा समाजाचे आतापर्यंत झालेले लाखोंचे मोर्चे हे शांततेत पार पडले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोर्चात देखील मुस्लिम समाजाने सहकार्य केले होते. मोर्चात सहभागी झालेल्या मराठा बांधवाना माणुसकीच्या भावनेतून पिण्याच्या पाण्याची व न्याहारीची ठिकठिकाणी सोय करण्यात आली होती. त्यामुळे मुस्लिम समाजाची भूमिका ही नेहमीच मराठा समाजाच्या बाजूने राहील. मराठा समाज लढत असलेल्या आरक्षणाच्या आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
