एक्साईजच्या सिंधुदुर्ग भरारी पथकाची कारवाई;एकाला घेतले ताब्यात..
⚡बांदा ता.०३-: डिगस (ता. कुडाळ) येथे घराच्या बाजूस राईमध्ये लपवून ठेवलेल्या दारू साठ्यावर सिंधुदुर्ग भरारी पथकाने शुक्रवारी कारवाई केली. काळया प्लॅस्टिकच्या कागदाखाली ३५ कागदी पुठ्ठ्यांमध्ये लपवून ठेवलेली १ लाख ६८ हजारांची दारू जप्त केली. याप्रकरणी ओंकार इंद्रजित सावंत (२६, रा. डिगस गोरीवलीवाडी) याला ताब्यात घेण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, डिगस गोरिवलीवाडी परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सिंधुदुर्ग भरारी पथकाने अचानक छापा टाकला. यावेळी घराच्या बाजूस असलेल्या राईमध्ये इसम संशयास्पद रीतीने फिरताना निदर्शनास आला. परिसराची पाहणी केली असता ३५ कागदी पुठ्ठ्यांमध्ये लपवून ठेवलेली गोवा बनावटीची दारू आढळून आली. याप्रकरणी ओंकार सावंत याला ताब्यात घेण्यात आले.
सदर कारवाई प्रभारी अधीक्षक वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शंकर जाधव, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, विशाल सरवटे, जवान जगन चव्हाण यांच्या पथकाने केली. पुढील तपास विशाल सरवटे करीत आहेत.
