पेंडुर जि.प. मतदार संघातील उबाठा सेनेचे बाळा कांबळी व राजू सावंत शिवसेनेत दाखल

⚡मालवण ता.२१-: पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक आणि पेंडुर शाखाप्रमुख बाबू कांबळी तसेच पेंडूर उपविभाग प्रमुख ज्येष्ठ शिवसैनिक रामू सावंत यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे.

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला. येत्या निवडणुकांमध्ये तसेच पक्ष संघटनेच्या कार्यामध्ये सहभागी होऊन पक्षाला आणखीन मजबूत करून मंत्री दीपक केसरकर, उदय सामंत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पेंडूर गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहू, असे यावेळी रामु सावंत व बाबू कांबळी यांनी स्पष्ट केले.

बाबू कांबळी आणि रामू सावंत हे दोघेही शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. शिवसेनेच्या उमेदीच्या आणि पडत्या काळातही शिवसेना ठाकरे पक्षाला विश्वासाने आणि हिमतीने साथ देत हे दोघेही कार्यकर्ते बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेरित होऊन आजपर्यंत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यरत राहिले. म्हणूनच यापुढेही फक्त नेतृत्व बदल करून शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे व आणि आनंद दिघे यांच्या विचाराने शिवसेना शिंदे गटात सामील झाले आहेत. मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर, कुडाळ मालवण मतदार संघ क्षेत्र प्रमुख बबन शिंदे यांच्यासोबत येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये व पक्ष कार्यात सहभागी होऊ, असे कांबळी व सावंत यांनी सांगितले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, राजन पोकळे, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, कुडाळ तालुकाप्रमुख योगेश तुळसकर, उपजिल्हाप्रमुख सुनील ढुबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page