साळेल येथील शेततळी कामातील दोषींवर कारवाई व्हावी…

अन्यथा आमरण उपोषण:उदय गावडे यांचा इशारा

मालवण (प्रतिनिधी)

साळेल येथे अस्तित्वात नसलेल्या शिवकालीन शेततळीवर ८ लाख ६७ हजार ८०० रुपये खर्ची घालण्यात आले. याबाबत केलेल्या चौकशी अहवालात दोषी आढळलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष येऊन शेततळी दाखवावी. अन्यथा २ ऑक्टोबर पासून आपण आपल्या निवासस्थानी आमरण उपोषणास बसू असा इशारा साळेल गावचे माजी सरपंच व शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे मालवण उपतालुकाध्यक्ष उदय विष्णू गावडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनादतून दिला आहे.

साळेल येथे अस्तित्वात नसलेल्या शिवकालीन शेततळीवर लाखो रुपये खर्चून झालेल्या कामाबाबत गेली ५ वर्षे सतत तक्रार करून प्रशासनाने दाखल घेतलेली नाही. सदर जागेत शिवकालीन शेततळी अस्तित्वातच नसल्याने शेततळीची नोंद ग्रामपंचायतच्या नावे झालेली नाही. याबाबत चौकशी होऊन दोन वर्षे झाली तारी चौकशी अहवालात दोषी आढळलेल्या तत्कालीन सरपंच व पाणी पुरवठा समिती अध्यक्ष, पाणीपुरवठा सचिव, ठेकेदार, उपअभियंता यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. याबाबत जिल्हाधिकारी व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणी लक्ष घालून प्रत्यक्ष गावात येऊन शिवकालीन शेततळी कुठे आहे ती दाखवावी, व साळेल ग्रामपंचायतचे रेकॉर्ड तपासावे, किंवा यातील दोषींवर तात्काळ कारवाई करावी. अन्यथा आपण उपोषणावर ठाम असून २ ऑक्टोबर रोजी शेवटचे आमरण उपोषण करू असा इशारा उदय गावडे यांनी दिला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी माझ्या घरी येऊन न्याय द्यावा तसेच मुख्यमंत्री यांनीही दखल घेऊन योग्य तो न्याय द्यावा, असेही उदय गावडे यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page