अवैध दारू वाहतूक प्रकरणी कोल्हापूर येथील एक ताब्यात…

२४ लाख ४५ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त:
कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क खात्याची कारवाई..

⚡बांदा ता.२४-: राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कोल्हापूर विभागीय पथकाने नांदगाव गिरगांव (ता. करवीर) रस्त्यावर गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या मोटारीवर कारवाई करत एकूण २४ लाख ४५ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक गजानन पाटील (वय ४७, रा. रुईकर कॉलनी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांचेवर अटकेची कारवाई करण्यात आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोव्यातून कोल्हापूरच्या दिशेने गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क खात्याच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार नांदगाव गिरगांव रस्त्यावर सापळा रचण्यात आला होता. कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीला (जीए ०३ वाय १३६३) तपासणीसाठी थांबविण्यात आले.
मोटारीत काळ्या रंगाच्या कपड्याखाली पुठ्ठ्याचे खोके झाकून ठेवण्यात आले होते. त्याची शहानिशा केली असता आतमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या १८० मिली मापाच्या १२४८ बाटल्या, ७५० मिली मापाच्या ३२४ बाटल्या व २००० मिलीच्या १२ बाटल्या असे एकूण ५५ खोके जप्त करण्यात आले. वाहनासह एकूण २४ लाख ४५ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क खात्याचे कोल्हापूर विभागीय उपायुक्त व्ही. पी. चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक एस. एस. गोंदकर, आर. जी. येवलुजे, कॉन्स्टेबल विलास पवार, सुशांत बनसोडे, अमोल यादव, योगेश शेलार यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. एस. गोंदकर करीत आहेत.

You cannot copy content of this page