Headlines

जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे; शेतकऱ्यांना जाहीर सवलती प्राधान्याने मिळणार

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून मळगाव येथे भातशेतीची पाहणी; पंचनामे गतीने करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

सावंतवाडी : प्रदीर्घ पावसाच्या खंडामुळे जिल्ह्यात भात पिकावर गंभीर परिणाम झाला असून काही भागात भात पीक करपले आहे. जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शासनाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी दुष्काळाची प्रथम स्थिती अर्थात ‘ट्रिगर-१’ जाहीर केली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रिगर-१ अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या सवलती शेतकऱ्यांना प्राधान्याने आणि तातडीने मिळाव्यात, तसेच पीक नुकसानीचे पंचनामे गतीने पूर्ण करावेत, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी सकाळी शेतकरी देवेंद्र गावकर यांच्या शेतावर भेट देऊन भात पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. प्रदीर्घ पावसाचा खंड, वाढलेले ऊन आणि पाण्याची कमतरता यामुळे भात पिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी वाढ खुंटली असून फुटवे कमी लागले आहेत. लोंब्या न आल्याने किंवा आलेल्या लोंब्यांमध्ये दाणे पुरेशा प्रमाणात न भरल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. करपा रोगासाठी औषधांची फवारणी करूनही अपेक्षित परिणाम झाला नसल्याचे शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. विहिरींच्या पाणीपातळीतही घट होत असल्याचे यावेळी निदर्शनास आले.

शेतकऱ्यांना जाहीर सवलतींचा तातडीने लाभ द्या

दरवर्षी जिल्ह्यात भरपूर पाऊस पडतो. मात्र, यावेळी परिस्थिती गंभीर झाली आहे. शासनाकडे जिल्ह्यातील परिस्थिती मांडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. आपण सध्या ‘ट्रिगर-१’च्या परिस्थितीत आलो आहोत. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या सवलतींची अंमलबजावणी प्राधान्याने करणे आवश्यक आहे, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. नुकसानीचे पंचनामे अधिक वेगाने पूर्ण करून त्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

पाणी बचत आणि भूजल पुनर्भरणावर भर

भविष्यात अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दीर्घकालीन आणि शाश्वत उपाययोजना करण्याची गरज असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. पावसाचे पाणी अडवणे, ते जमिनीत मुरवणे, बंधारे उभारणे तसेच भूजलाचे योग्य व्यवस्थापन करणे यावर भर देणे आवश्यक आहे. पाणी बचत ही प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज असून, पावसाचे पाणी अधिकाधिक प्रमाणात जमिनीत मुरविण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना राबविण्याचे आवाहन त्यांनी केले.

‘जलतारा’ उपक्रमाचे उद्घाटन

मळगाव येथे भूजल पुनर्भरणासाठी तयार करण्यात येणाऱ्या ‘जलतारा’ खड्ड्याचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविण्यासाठी अशा उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. जिल्ह्यात पाणी संवर्धन आणि भूजल पुनर्भरणाच्या कामांना गती देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, लघू पाटबंधारे, जलसंधारण विभागाचे अधिकारी यांच्यासह स्थानिक ग्रामस्त व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page