उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची बोचरी टीका
कणकवली : वर्षभरापूर्वी कणकवली क्रीडांगणसाठी 4 कोटींचा निधी दिल्याचे संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात दमडीही मिळाली नसल्याने 4 कोटीचा निधी दिल्याचे सिद्ध केल्यास आम्ही राजकीय संन्यास घेण्याचे आम्ही जाहीर केले होते. पण पारकर यांनी आमचे आव्हान स्वीकारले नाही आणि आता वर्षभरानंतर आमदार वैभव नाईक यांच्या पदराआडून प्रकट झाल्याची बोचरी टीका उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केली. पारकर आणि नाईक गटाची नगरपंचायत मध्ये मागील टर्ममध्ये अडीच वर्षे सत्ता असताना माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून 6 कोटी 40 लाखांचा निधी मिळाला. तो निधी खर्चही पारकर करू शकले नाहीत. मात्र 700 रुपयांचा वॉटर मीटर 2 हजार 143 रुपयांना आणि 40 रुपयांचे डस्टबीन 130 रु दराने खरेदी करण्याची किमया केली. त्यामुळे भ्रष्टाचाराचे भूत पारकर – नाईक यांच्या डोक्यात असल्याची टीका उपनगराध्यक्ष हर्णे यांनी केली.
