भारतातील पहिल्या फिश थीम पार्कचे सोमवारी सिंधुदुर्गात उद्घाटन…

केसरी फणसेवाडी येथे सुरू होणार के एस आर ग्लोबल ॲक्वेरिअम:पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती..

⚡कुडाळ ता.०९-: भारतातील पहिलंवहिलं फिश थीम पार्क उभारण्याचा मान आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. या फिश थीम पार्कमध्ये नागरिकांना देशाविदेशातील विविध प्रकारचे मासे आणि पक्षी पाहायला मिळणार आहेत. सावंतवाडी तालुक्यातील दाणोली गावाजवळ असणाऱ्या केसरी-फणसवडे येथे हे केएसआर ग्लोबल ॲक्वेरिअम उभारण्यात आले असून येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधूदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.

आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. हा जिल्हा निसर्गाच्या नवलाईने नटलेला आहेच, पण त्यासोबतच वॉटर स्पोर्ट्स आणि पर्यटनाच्या दृष्टीने उपयुक्त असे इतर अनेक उपक्रम इथे राबवले जातात. जिल्ह्यातील अनेक कुटुंबांची उपजीविका पर्यटन क्षेत्रावरच अवलंबून आहे.असे सांगतानाच मंत्री चव्हाण यांनी सांगतिले की, निसर्गाच्या विविधतेने नटलेला भारताइतका दूसरा देश नसेल. इथे जसं निसर्गसौंदर्य आहे, तसंच जैवविविधता ही बघायला मिळते. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जेव्हापासून पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली आहे, तेव्हापासून ही जैवविविधता जोपासण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले जात आहेत. त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे मोदी सरकारतर्फे प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना राबवण्यात येत आहे. या योजनेपासून प्रेरणा घेऊनच हे पाऊल उचलण्यात आले आहे. आगामी काळात हा प्रकल्प आणखी विस्तारीत होईल आणि इथल्या नागरिकांना मनोरंजनासोबतच पर्यावरण रक्षणासाठी आणखी एक हक्काचे व्यासपीठ मिळेल, असा विश्वासही चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

फिश थीम पार्क बद्दल बोलताना पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले की कोकणात पर्यटनाला उत्तम संधी आहे येथील पर्यटन जास्तीत जास्त विकसित करण्याचा आपले उद्दिष्ट आहे. यामध्ये विविध प्रकारचे रंगीत मासे तसेच गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासे, देशविदेशातील माशांच्या प्रजाती यांचा या फिश थीम पार्कमध्ये समावेश आहे. याचा फायदा कोकणवासियांना तसेच महाराष्ट्रातील सर्वांना होणार आहे. विशेष म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना यांचा फायदा मिळणार आहे या फिश थीम पार्कचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे, असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

या फिश थीम पार्क मध्ये माशांना फीडिंग करण्याची व्यवस्था तसेच छोटेखानी तळेही निर्माण करण्यात आले आहे. या तळ्यामध्ये मत्स्यप्रेमींना फिशिंगचा अनुभव मिळणार आहे. या फिश थीम पार्कमध्ये सुमारे तीन हजार पाचशे विविध जातीचे मासे आपल्याला पाहायला मिळणार असून गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासे तसेच खाडीच्या पाण्यातील मासे पहावयास मिळणार आहेत, असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page