माजी आमदार परशुराम उपरकर : दांडेली-आरोस मध्ये सायबर क्राईम मार्गदर्शन शिबिर
⚡बांदा ता.०९-: जिल्ह्यात अनेक ठिकाणी सायबर क्राईम घडत आहे. सायबर क्राईम मार्गदर्शन फक्त तुमच्यापुरते न ठेवता तुमच्या परिसरातील सर्वांना याबाबत माहिती द्या. बँक मधून बोलतोय आपला ओटीपी नंबर सांगा असे सांगून लोकांना लुबाडले जाते. विद्यार्थ्यांनी ही माहिती पालकांना व परिसरात सांगून त्यांना भविष्यात होणाऱ्या आर्थिक नुकसानात वाचवू शकता. आपली आर्थिक फसवणूक होऊ नये याची दक्षता सर्वांनी घ्या. यासाठी जनजागृती करा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले.
विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग तर्फे सायबर क्राईम मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक चंद्रशेखर ठाकूर तसेच आरोस शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष निलेश परब, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, विभाग अध्यक्ष मंदार नाईक, नंदू परब, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष संदेश सावंत, शहराध्यक्ष निलेश देसाई, शाखाप्रमुख सुनील नाईक, मुकुंद धारगळकर, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
जगभरातील इंटरनेटमुळे जनतेला फसवणूक करणारे मेसेज, बनावट फोन, ई-मेल, ऑनलाईन होणारी आर्थिक व्यवहारातील फसवणूक पासून आपण स्वतःला सुरक्षित ठेवून कसे रोखू शकतो यावर चंद्रशेखर ठाकूर यांनी स्लाईड शो द्वारे मार्गदर्शन केले. यावेळी पालक, ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारत शंकांचे निरसन करून घेतले.
महाविद्यालयाच्या प्रा. सुषमा मांजरेकर यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा मनसेच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाखा प्रमुख प्रविण आरोसकर, स्वप्नील जाधव, ज्ञानेश्वर नाईक, तुकाराम(बाबल) परब यांनी शिबीर आयोजनासाठी सहकार्य केले. यावेळी शिक्षक विवेकानंद सावंत, नितीन बागवे, मोहन पालेकर, शिक्षिका ए. गावडे व अन्य शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक निलेश देऊलकर यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सदाशिव धुपकर यांनी तर मंदार नाईक यांनी आभार मानले.