आंबोली,ता.७: चौकुळ महाविद्यालयाला स्वयंअर्थसहायित मान्यता शासनाकडून मिळाली आहे त्यामुळे इथल्या स्थानिक विद्यार्थ्यांची सोय झाली आहे.
ग्रामदेवी सातेरी भावई च्या कृपेनें, राणी पार्वती देवी ची संचालक संस्था शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले आणि प्रा. मधुकर मनोहर गावडे उर्फ आबा गावडे यांच्या सह असंख्य चौकुळकर शिक्षण प्रेमिंच्या कष्टाना फळ मिळाले. महाराष्ट्र शासनाचे चौकूळ स्वयं अर्थ सहायित कनिष्ठ महाविद्यालयाला मंजुरी मिळाल्याचे पत्र प्राप्त झाले आहे.चौकूळ इंग्लिश स्कूलला अकरावी आणि बारावी (कला आणि वाणिज्य ) मराठी माध्यम आणि अकरावी आणि बारावी (विज्ञान ) इंग्रजी माध्यमातून दर्जा वाढीचा प्रस्ताव शासनाने आपल्या दिनांक ४ सप्टेंबर, २०२३ च्या मान्यता पत्रा द्वारे कळविला आहे.
चौकूळ आणि पंचक्रोशीतील गरीब, वंचित आणि दहावी नंतर चे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या, परंतु प्रतिकूल आर्थिक परिस्तिथी मुळे सावंतवाडी किंवा तत्सम शहरात जाऊन शिक्षण घेऊ न शकणाऱ्या असंख्य विध्यार्थी विध्यार्थिनींची गैर सोय दुर करण्यात प्रा. मधुकर आबा गावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यश आले आहे.
शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी (आरपीडी.)चे अध्यक्ष श्री. विकास सावंत,प्राचार्य श्री.धोंड सर,आमदार आणि राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर आणि त्यांच्या खात्याचा अधिकारी वर्ग, शिक्षणाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा, उप संचालक, कोल्हापूर, शिक्षण संचालक, पुणे यांचे चौकुळ ग्रामस्थानी आभार व्यक्त केले आहेत. दुर्गम भागात आणि चौकुळच्या खडकाळ भूमीत मधुकर गावडे तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणप्रेमी यांनी दूरदृष्टीने रोवलेल्या या वृक्षाच्या संगोपनात सर्वांचे सहकार्य लाभो अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
