भूजलाशयीन संस्था नोंदणी धोरण समितीत रविकिरण तोरसकर व प्रा. केतन चौधरी यांची नियुक्ती

⚡मालवण ता.२२-: भूजलाशयीन मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था आणि संघ नोंदणीबाबत नवीन धोरण तयार करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने गठित केलेल्या तज्ज्ञांच्या समितीत सदस्य म्हणून रत्नागिरी मत्स्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. केतन चौधरी आणि आत्मनिर्भर मत्स्य शेतकरी संघटनेचे समन्वयक रविकिरण तोरसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीची सभा २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नाशिक येथील हॉटेल केवलमध्ये होणार आहे.

एकाही तलावावर उपविधीत समाविष्ट नसलेल्या २९२ संस्थापर्यंत कसे पोहोचता येईल, याबाबत उपाययोजना सुचविणे, दहा किलोमीटरच्या परिघातील अंतर मर्यादेमुळे इतक्या वर्षानंतरही ६३९ तलावांवर संस्था नोंदणी न होऊ शकणे, एका तलावावर एकच संस्था नोंदणीमुळे २९२ संस्थांच्या नावावर एकही तलाव नसणे, याबाबतच्या अडचणी दूर करून परंपरागत भोई, कहार, ढीवर, व कोळी – मच्छीमार या दुर्बल घटकांना संधी देऊन त्यांना योजनेचे लाभ कसे पोहोचविता येतील, याबाबत उपाययोजना सुचविणे, एका तलावावर एकच संस्था यामुळे राज्यात १७९१ तलाव असे आहेत, ज्यावर केवळ एकच संस्था नोंदणीकृत आहे. इतर कोणत्याही सहकारी संस्थेची नोंदणी त्या ठिकाणी होऊ शकत नाही. यामुळे भविष्यात संस्था स्थापन करण्याचा हक्क उरलेले नाहीत. यावर उपाययोजना करणे आदी विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य भूजलीय मत्स्य व्यवसाय अधिनियम १९६० मध्ये सुधारणा करून सुधारित भूजलीय मासेमारी अधिनियम लागू करण्यासाठी शासनाने या अगोदर गठित केलेल्या तज्ज्ञांच्या समितीत प्रा. चौधरी आणि तोरसकर सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

You cannot copy content of this page