कुडाळ पंचायत समिती साजरी करणार ‘ चिखलधुनी ‘ महोत्सव…

२६ रोजी अणाव हुमरमळा येथे आयोजन:प्रशासक विजय चव्हाण यांची माहिती

⚡कुडाळ ता.२४-: कुडाळ पंचायत समितीच्या वतीने मान्सून महोत्सव अंतर्गत ‘चिखलधुणी’ हा अभिनव उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच बुधवारी, २६ जुलै रोजी सकाळी ९ वाजता अणाव-हुमरमळा येथे राबविण्यात येणार आहे.या ठिकाणी दोन कोपऱ्यामध्ये जोत बांधून पारंपरिक शेती व दुसरी आधुनिक पद्धतीची शेती लागवड केली जाईल. नवीन पिढी मातीपासून दूर गेली असून त्यांची पुन्हा मातीशी नाळ जोडली जावी हा या मागचा उदात्त हेतू आहे. तसेच हुमरमळा ग्रामपंचायत मालकीच्या २ हेक्टर जागेत विविध अशा १५० वनौषधीचा जिल्ह्यातील पहिला प्रकल्प साकारत आहे. त्याचबरोबर नरेगा अंतर्गत बाबू आणि फळ लागवड उपक्रम राबवून अशा विविध उपक्रमानी चिखलधुणी साजरा केला जाणार आहे अशी माहिती कुडाळ पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली.

याबाबत बोलताना गटविकास अधिकारी विजय चव्हाण म्हणाले की, भारत हा शेतीप्रधान देश आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आपण कृषी क्षेत्रात सुधारित कृषी तंत्रज्ञान व संशोधन आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणांचा वापर करून क्रांती केली आहे. पावसाळ्यात कोकणात प्रामुख्याने भात हे मुख्य पीक घेतले जाते. भात पिकालाही सुधारित संकरित वाण आणि यांत्रिकीकरण याद्वारे मोठी प्रगती झाली आहे. शेतकरी कमीत कमी क्षेत्रात संकरित वाण व यांत्रिकीकरणाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेत आहेत.
तरीही पौष्टिकता आणि औषधीय गुणधर्माच्या उपलब्धतेमुळे आजही जुन्या पारंपरिक वाणाच्या भाताचे आहारातील महत्त्व वाढले आहे. मात्र, असे असले तरीही वाढते शहरीकरण व झपाट्याने कमी होणारी श्रमप्रतिष्ठा, शेतीत काम करणारे मनुष्यबळ कमी होत असल्याने दरवर्षी भात पिकाखालील क्षेत्र घटत आहे. त्यामुळे भातशेती करणारा आपला बळीराजा किती कष्टाने शेती पिकवतो याची ओळख नोकरदार बंधू-भगिनींना व्हावी, शेतकऱ्यांबद्दल मनात आदरभाव निर्माण व्हावा, जिला आपण माता संबोधतो त्या मातीशी संपर्क वाढावा म्हणून आम्ही पंचायत समिती कुडाळचे सर्व कर्मचारी २६ जुलै रोजी एक दिवस शेतकऱ्याच्या शेतात उतरून पारंपरिक पद्धतीने स्थानिक वाण आणि श्री पद्धतीने सुधारित वाणाच्या भात रोपांची लावणी करून शेतक-यांचा सन्मान करणार आहोत. आयुर्वेदात असे म्हटले आहे की, ज्या भौगोलिक क्षेत्रात आपण राहतो तिथे होणाऱ्या आजाराचे औषध तिथल्याच मातीत रुजून येते. म्हणजे त्या-त्या भागातील वनौषधी तिथल्या भागात होणान्या आजारांवर उपचार ठरतात. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागच्या पिढीला या वनौषधींचे ज्ञान होते. त्यामुळे हा प्रकल्प साकारत आहोत
पुढील पिढीला आपला हा समृद्ध वनौषधीचा वारसा देणे हे आपले कर्तव्य आहे. आम्हाला वाटत की, ही महाराष्ट्र राज्यात ग्रामपंचायत क्षेत्रात केलेली पहिली वनौषधीची बाग असेल. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतील फळबाग लागवड आणि बांबू लागवड यामध्ये कुडाळ तालुका नेहमी अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे चालू वर्षाच्या लागवडीचा शुभारंभ सुद्धा आम्ही याच दिवशी हुमरमळा-अणाव या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात करणार आहोत.
मागील वर्षी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत चांगले काम करणाऱ्या ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी व ग्रामरोजगार सेवक यांचा सत्कारही आयोजित केला आहे.
शेतकरी न्हानू पांडुरंग पालव याच्या शेतावर हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. शेतकरी राजा नटून थटून शेताच्या बांधावर असणार आहे. यावेळी पूर्वी शेतात गाणी गाण्याची पद्धत होती तो गाण्याचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. मागील १५ दिवस माझ्या मागदर्शनखाली सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, कृषी अधिकारी बाळकृष्ण परब, प्रफुल्ल वालावलकर, दत्ताराम आंबेरकर, विस्तार अधिकारी रामचंद्र जंगले, संजय आरोस्कर, कक्ष अधिकारी मृणाल कार्लेकर, गीता चेंदवणकर, धनश्री परब, समीरा केरकर, गणेश राठोड, महादेव खरात, प्रशासक संदेश परब, कांचन कदम आदींनी यासाठी मेहनत घेतली आहे. राज्यात अशाप्रकारचा पहिलाच अभिनव उपक्रम असेल असेही चव्हाण यांनी सांगितले

चिखलधुणी म्हणजे शेतकऱ्याचा आनंदोत्सव
चिखलधुणी म्हणजे शेतकऱ्याचा आनंदोत्सव असून या सोहळ्याला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा कृषी विकास अधिकारी जानबा झगडे, नरेगा गटविकास अधिकारी विरेश अंधारी, गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती आहे. हुमरमळा अणाव
या शेती कोपऱ्यामध्ये पारंपरिक व आधुनिक पद्धतीची शेती केली जाणार आहे.

You cannot copy content of this page